जळकोट (संजय रेणुके) :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघात दि. 20 जून रोजी पार पडलेल्‍या पदवधीर आमदार निवडणुकीसाठी मतप्रकियेद्वारे मतदान घेण्‍यात आले. त्‍यामुळे निवडणुक आयोगाच्‍या गंभीर चुकीमुळे गोपनियतेचा तडा गेला असल्‍याने मतदारातून नाराजीसह तीव्र आक्षेप घेतला जात असून सदर मतदान प्रक्रियेत बदल करावा, अशी मागणीही पदवीधर मतदारांमधून केली जात आहे.
         याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून दिल्‍या जाणा-या पदवीधर आमदार पदासाठी दि. 20 जून रोजी मतदान घेण्‍यात आले. सदर मतदान प्रक्रिया ही आधुनिक ईव्‍हीसी मशीनवर न घेता पूर्वीच्‍या मतपत्रिकेद्वारे घेण्‍यात आली असून सदर मतपत्रिकेवर छापील मतपत्रिका क्रमांक आहे. त्‍यातच मतपत्रिका फाडून निवडणुक आयोगाकडे जमा असणा-या क्‍वार्टर पत्रीकेवरही मतपत्रिकेवरील छापील क्रमांक एकच आहे. त्‍यातच क्‍वार्टर पत्रिकेवर मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक लिहिला जातो, मतदारांची स्‍वाक्षरीही घेतली जाते. त्‍यामुळे क्‍वार्टर पत्रिकेवरील छापील क्रमांक मतपत्रिकेवरील असल्‍यामुळे सदर मतदाराने कोणत्‍या उमेदवारास मतदान केले आहे, हे सहज समजू शकते. म्‍हणूनच सदर मतदान प्रक्रियेत भंग होऊ शकतो, हे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे तुळजापूर लाईव्‍हच्‍या प्रतिनिधीने तुळजापूर तालुक्‍यातील जळकोट येथे पार पडलेल्‍या मतदान केंद्रावर केंद्राध्‍यख डॉ. व्‍ही.जी. टाकणखार, झोनल अधिकारी तथा गटविकास अधिकारी संजय खिलारे यांना संबंधित मतदान गुप्‍ततेचा भंग झाल्‍याचे निदर्शनास आणून देऊन लेखी आक्षेप घेण्‍याविषयी विनंती केली असता, त्‍यांनी तक्रार घेण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे सदर प्रतिनिधीने तुळजापूर तहसिलदार काशिनाथ पाटील यांनाही माहिती फोनद्वारे देवून वस्‍तुस्थिती मांडली. त्‍यावेळी त‍हसिलदारांनी सदर प्रक्रियेत चूक असल्‍याचे कबूल केले. पण याबाबत निवडणुक आयोगाच अंतिम निर्णय घेऊ शकतो, आम्‍ही काहीच करु शकत नाही, अशी हतबलता पाटील यांनी व्‍यक्‍त केली.
          उपरोक्‍त प्रक्रियेत मतदारांना दिल्‍या जाणा-या मतपत्रिकेवर जो छापील क्रमांक मुद्रित करण्‍यात आला आहे तो क्रमांकच नाही छापल्‍यास मात्र सदर मतदानाची गुप्‍तता राहू शकते, हे येथे नमूद करावेसे वाटते. त्‍यामुळे निवडणुक आयोगाने उपरोक्‍त बाबीचा गांभिर्याने विचार करुन पुढील मतदान प्रक्रियेत बदल करावा, अशी मागणी होत आहे.
 
Top