उस्मानाबाद -: जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे दोन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. एवढा मोठा निधी नियोजन समितीतून देणे शक्य नसल्याने खासदार व आमदारांनी त्यांचा निधी यासाठी उपलब्ध करुन द्यावा, असे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले.
        येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. खासदार रविंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार सर्वश्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि ज्ञानराज चौगुले, औरंगाबाद विभागाचे उपायुक्त (नियोजन) श्री. महानवर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
      जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्तीसंदर्भात जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर यांनी विषय उपस्थित केला होता. याविषयावर तत्कालिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. सदर हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती करुन ती जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करावी, त्याची देखभाल करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद घेईल, असे त्यांनी सांगितले.
        यावर पालकमंत्री चव्हाण यांनी या दुरुस्तीसाठी जास्त निधीची आवश्यकता असून त्यासाठी जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांनी सुरुवातीला त्यांच्या निधीतील प्रत्येकी पाच लाख रुपये निधी द्यावा, असे सुचविले.  हुतात्मा स्मारक हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने त्याची देखभाल करणे, परिसर स्वच्छता याची जबाबदारी त्या-त्या गावातील नागरिक आणि ग्रामपंचायतीचीही असल्याचे त्यांनी सांगितले. आपला इतिहास आपण जपला पाहिजे, असे ते म्हणाले.
 
Top