उस्मानाबाद -: तुळजापूर येथे सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री ना. सुनील तटकरे यांनी बुधवार दि. 11 जून रोजी दिल्‍या.
    तुळजापूर, उमरगा व लोहारा तालुक्यातील कृष्णा-मराठवाडा प्रकल्पांतर्गत सामान्य जनतेच्या पिण्याच्या पाण्याची कामे तत्काळ सुरू करण्यासंदर्भात उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी बुधवार ही बैठक जलसंपदामंत्री ना. सुनील तटकरे यांच्या दालनात आयोजित केली होती.
    रामदरा बंधार्‍याची कामे त्वरित सुरू करण्यात यावीत, तुळजापूरसाठी दोन टीएमसी पाणीपुरवठा तत्काळ करावा, तुळजापूरला भविष्यात योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी दोन पंपहाऊसची कामे करावीत, धनेगाव साठवण तलावासह आणखी तीन तलावांची कामेही तत्काळ सुरू करावीत, अशा सूचनाही बैठकीत चव्हाण यांनी केल्या. जिल्ह्यातील साठवण तलाव बांधण्यासाठी लागणारी जमीन शेतकरी देण्यासाठी तयार असून, ही कामेही त्वरित सुरू करावीत, जेणेकरून शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागेल, असेही चव्हाण यांनी यावेळी म्हणाले.
    यावेळी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, जलसंपदा प्रधान सचिव एकनाथ पाटील, अधीक्षक अभियंता कोकाटे व अन्य अधिकारी उपस्थित होते. तटकरे यांच्या आदेशावरून तातडीने कामे उरकल्यास भविष्यात तुळजापूरमध्ये कधीही पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवणार नाही. यामुळे भाविकांनाही विकतचे पाणी घेऊन तहान भागविण्याची वेळ येणार नाही.
 
Top