नळदुर्ग :- धनगरवाडी (ता. तुळजापूर) येथील महिला सरपंच जयश्री केशव येडके यांच्‍या अपात्रतेविषयीच्‍या प्रकरणाची फेरतपासणी करण्‍यात यावी, असे आदेश उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने उस्‍मानाबाद जिल्‍हाधिका-यांना दिले होते. या प्रकरणाच्‍या सखोल चौकशीनंतर औरंगाबाद खंडपीठाने अखेर सरपंच जयश्री येडके यांना अपात्र असल्‍याचा निर्णय दिला आहे.
    तुळजापूर तालुक्‍यातील धनगरवाडी येथील महिला सरपंच जयश्री केशव येडके यांच्‍याविरुध्‍द जबाबदारीने काम करीत नसल्‍याबाबत, पाणीपुरवठा, नियमित ग्रामसभा न घेणे, पथदिव्‍याची व्‍यवस्‍था न करणे आदी प्रकारच्‍या आशयाची तक्रार संजय निवृत्‍ती चव्हाण यांनी ग्रामस्‍थांच्‍या सहीनिशी दि. 27 फेब्रुवारी 2013 रोजी गटविकास अधिका-यांकडे केली होती. त्‍या अनुषंगाने गटविकास अधिका-यांना जयश्री येडके यांना चुका सुधारण्‍याबाबत सुचित केले होते. परंतु त्‍यानंतरही त्‍यांच्‍या कामात सुधारणा न झाल्‍याने जिल्‍हाधिका-यांकडे दाखल केलेल्‍या या प्रकरणांमध्‍ये जिल्‍हाधिका-यांनी सरपंच जयश्री येडके यांचे पद रद्द करण्‍यात येत असल्‍याचा निर्णय दिला होता. या निर्णयास गैरअर्जदार यांनी उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्‍या रिट याचिकेत चव्‍हाण यांच्‍याविरुध्‍द जयश्री येडके या प्रकरणाचा दि. 15 एप्रिल रोजीच्‍या निर्णयानुसार जिल्‍हाधिका-यांना न्‍यायालयाने या निर्णयाची फेरचौकशी करण्‍यात यावी, असे आदेशित केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली असून अखेर औरंगाबाद खंडपीठाने सरपंच जयश्री येडके यांना अपात्र असल्‍याचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात अर्जदार संजय चव्‍हाण यांच्‍यावतीने अॅड. डी.एन. सोनवणे यांनी काम पाहिले.
 
Top