नळदुर्ग -:  येथील हजरत नानीमॉं सरकार ट्रस्‍ट संचलित सय्यद अब्‍दुल्‍लाशहा मेमोरियल उर्दू शाळेतील शालेय पोषण आहार घोटाळ्याप्रकरणी संस्‍थाचालकासह  मुख्‍याध्‍यापिकेवर न्‍यायालयाच्‍या आदेशाने  पोलीसात  गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
    मुख्‍याध्‍यापिका महेबुबवी शेख , संस्‍थेचे अध्‍यक्ष सय्यद तन्‍वीर खतीब , सचिव जावेद काझी (सर्व रा. नळदुर्ग) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍याचे नावे आहेत.
नळदुर्ग शहरातील हजरत नानीमॉं सरकार ट्रस्‍ट संचलित सय्यद अब्‍दुल्‍ला शहा मेमोरियल उर्दू शाळेच्‍या  विधार्थ्‍याना  देण्‍यात येणा-या  शालेय पोषण आहाराचे साहित्‍य विक्रीच्‍या हेतूने साठवून अवैधरित्‍या ठेवलेला साठा पोलीस व शिक्षण विभागाच्‍या अधिका-यांनी सप्‍टेंबर 2013 मध्‍ये छापा मारुन जप्‍त केला होता. यामध्‍ये तांदुळ, डाळी, तेल, मिरची, जिरे इत्‍यादी साहित्‍याचा साठा मिळून आला होता. ज्‍याची किंमत 1 लाख 14 हजार रुपये इतकी होती.
    शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या तोंडचा घास पळविणा-यावर  कठोर कारवाई करावी, यासाठी मनसेचे जिल्‍हा सचिव अमर परमेश्‍वर कदम यांनी 16 व 17 सप्‍टेंबर 2013 रोजी मिळालेल्‍या पुराव्‍यान्‍वये सदरील शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका तसेच संस्‍थेचे अध्‍यक्ष व सचिव यांच्‍याविरुध्‍द तुळजापूर न्‍यायालयात फिर्याद दिली होती. यावरुन न्‍यायालयाने पुरावे ग्राह्य धरुन शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका महेबुबवी शेख तसेच संस्‍थेचे अध्‍यक्ष सय्यद तन्‍वीर खतीब व सचिव जावेद काझी (सर्व रा. नळदुर्ग) यांच्‍याविरुध्‍द गुन्‍हा दाखल करण्‍याचे आदेश नळदुर्ग पोलिसांना दिले. यावरुन पोलिसांनी वरील तिघांविरुध्‍द गुन्‍हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.वाय. डांगे हे करीत आहेत.
सध्‍या  शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका महेबुबवी शेख सध्‍या याप्रकरणी निलंबित आहेत. तर गुन्‍हा दाखल झालेले संस्‍थेचे सचिव जावेद काझी हे जिल्‍हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत.
 
Top