बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- फेसबुकवरील महापुरुषांची विटंबनाप्रकरणी बार्शी बंद करण्यात आली असून शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. शहरातील विविध सामाजिक संघटना तसेच विविध पक्षांच्या वतीने बार्शी पोलिसांना निवेदन देऊन संबंधीत आरोपींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. बार्शी शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने याप्रकरणी वैराग, पांगरीसह बार्शी आज बंद करण्यात आली आहे.
येथील मराठा महासंघ, बार्शी शहर व तालुका शिवसेना, संभाजी ब्रिगेड, जयशिवराय प्रतिष्ठान, कॉंग्रेस सह विविध सामाजिक संघटनांनी बार्शी पोलिसांना निवेदने दिली आहेत. शहरातील विविध भागात फिरुन शिवसैनिकांनी बार्शी बंदची हाक दिली. यावेळी व्यापार्‍यांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. बार्शी बसस्थानक चौकात शिवसेनेच्या वतीने भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिस उप अधिक्षक रोहिदास पवार यांना लेखी निवेदन दिले. यावेळी बोलतांना आंधळकर यांनी गुन्हेगाराची जात पाहण्यापेक्षा त्याची प्रवृत्ती पहावी. अशा प्रकारच्या गुन्हेगारांना मोकासारख्या कायद्याचा वापर करुन फाशीसारखी शिक्षा करण्याची तरतूद करण्यात येणे गरजेचे आहे. हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सारख्या पक्षांच्या वतीनेही अशा प्रकारचे कुटील कारस्थान केले असल्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांनी कोणावरही दगड पडणार नाही याची दक्षता घ्यावी असही त्यांनी यावेळी म्हटले.
 
Top