बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- खामगाव शिवारात आर्यन शुगर्सच्या नजीक झालेल्या नागेश गाढवे खून प्रकरणातील संशयीत आरोपींनी नारी शिवारातील कुलकर्णी यांच्या शेतात लपविलेली गुन्ह्यातील हत्यारांची जागा दाखविली. सदरच्या ठिकाणी लपविलेल्या तलवार व कुकरी पोलिसांनी हस्तगत केली आहे. आज न्यायालयासमोर हजर केल्यावर दि.९ जून पर्यंत पोलिस कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत. आझाद चौक येथील नागेश गाढवे (वय २३) या युवकाचा दि.३१ मे रोजी निर्घून खून झाला. मिळालेल्या माहितीवरुन पांगरी पोलिसांनी अमोल संजय मोहिते (वय २४), प्रशांत उर्फ प्रविण नवनाथ रिकीबे (वय २४,रा. राऊत चाळ), नितीन पंडित माने (वय २७, रा.सुभाष नगर), दिनेश निलप्पा कोरे (वय २३, रा.ममता बालक मंदिर जवळ, सुभाष नगर) अशा चार संशयीतांना अटक केली. संशयीतांना सोलापूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता, ४ जून पर्यंत पोलिस कोठडी दिली. यामध्ये आरोपींनी घटनेची हकिकत सांगीतली.
     सदरच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कुकरी व तलवार आदी हत्यारे नारी शिवारातील कुलकर्णी यांच्या शेतात लपवून धाराशिव (उस्मानाबाद) कडे आरोपी निघून गेले. तेथून पंढरपूर येथे जाऊन गोवा येथे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाल्यानंतर घटनेचा जलद तपास सुरु झाला. तर इकडे यातील आरोपी अटक करण्यासाठी पोलिस उपधिक्षक कार्यालयासमोर प्रेत ठेवण्याचा इशारा मृताच्या आप्तेष्टांनी दिला होता. पोलिसांनी काही आरोपी अटक केल्यानंतर मृताचा अंत्यविधी करण्यात आला. यानंतर नातेवाईकांनी यांच्यामागे असलेल्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत. पत्रकारांना बोलतांना मृताच्या नातेवाईकांनी तपासात हयगय केल्यास पोलिस उपाधिक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे सांगीतले. त्याचप्रमाणे काही ऍटोरिक्षावर लावलेल्या डिजीटलद्वारे गाढवे कुटूंबास न्याय मिळालाच पाहिजे, मुख्य सुत्रधारास अटक झालीच पाहिजे, नि:पक्ष तपास झालाच पाहिजे अशा मागणी चा जाहीर संदेश देण्यात आला आहे.
 
Top