पांगरी (गणेश गोडसे) :- जिल्हा परिषदेच्या पाणलोट विभागातर्फे बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या बंधारे खोली व सरळीकरण योजनेमुळे पाणीसाठयात मोठी वाढ होऊन जलपुर्णभरण प्रकिया तात्काळ पुर्ण होण्‍यास मदत मिळणार आहे. या योजनेमुळे पडलेल्या पहिल्या पावसाचे पाणी शेतक-यांच्या विहीरी, कुपनलिका यासह जलस्त्रोत्रात वाढ होण्‍यास उपयुक्त ठरणार आहे.
    सध्या बार्शी तालुक्यात नदया, नाले व ओढयावर असलेल्या विविध पध्‍दतीच्या बंधा-यामध्ये गाळ साठल्यामुळे बिनकामी ठरत होते. पावसाचे पडलेले पाणी बंधारे गाळाने भरलेले असल्यामुळे न थांबता पुढे निघुन जात होते. त्यामुळे त्या त्या भागातील शेतक-यांना पहिल्या पावसाचा म्हणावा असा फायदा मिळत नव्हता. मात्र शासनाच्या पाणलोट विभागाने याकडे गांभिर्याने बघुन अनेक वर्षांपुर्वी झालेले व सध्या गाळाने भरलेल्या स्थितीत असलेल्या बंधा-यांचे पुर्नजिवन करण्‍याचा निर्णय घेतला आहे.
    जे.सी.बी.सारख्या आधुनिक यंत्रसामुग्रीच्या साहय्याने बंधा-यामधील गाळ काढला जात आहे. गाळ काढुन बाहेर टाकल्यामुळे बंधा-याची खोली मोठया प्रमाणात वाढत आहे. बंधा-यातील गाळ काढताना टनक जमिन लागेल तेथपर्यत यंत्राच्या सहाय्याने काम केले जाते. परिणामी पहिल्या पावसाचे पाणी त्या बंधा-यातच थांबुन शेजारील शेतक-यांच्या विहीरींना पाणीसाठयात वाढ होण्‍यास मदत मिळणार आहे. यावर्षी प्रायोगिक तत्वावर बार्शी तालुक्यातील कांही मोजक्याच बंधा-यातील गाळ काढला जात असुन शासनाने इतर बाबींवर खर्च करण्‍यापेक्षा जलसंधारणाकडे लक्ष देत बार्शी तालुक्यातील सरसकट बंधा-यातील गाळ काढावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.
कामे गुणवत्तापुर्ण व्हावी :
    बार्शी तालुक्यात नदया, नाले यासह छोटया छोटया ओढयांवर बांधण्‍यात आलेल्या बंधा-यातील गाळ काढुन बंधा-यांची उंची वाढवण्‍याची कामे धुमधडाक्यात सुरू असली तरी संबंधित ठेकेदारांनी विवेकबुध्‍दी जागृत ठेऊन किमान शेतक-यांसाठी तरी बंधारा रूंदीकरण व खोलीकरणाची कामे गुणवत्तापुर्वक करावीत, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. बंधा-याच्या कामासाठी पाच लाख रूपयांपर्यत निधी दिला जात असल्याचे समजते. तरीही स्थानिक शेतकरी तक्रारी करत असल्याचे दिसत आहे.
 
Top