पांगरी (गणेश गोडसे) :- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सोशल मिडीया असलेल्या फेसबुकवर विटंबना केल्याच्या निषेधार्थ सोमवार दि. 9 जून रोजी पांगरी (ता. बार्शी) येथे कडकडीत बंद पाळण्‍यात आला. विटंबना करणा-या समाजकंटकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशा आशयाचे लेखी निवेदन पांगरी पोलिसांना देण्‍यात आले.
    फेसबुकवर डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या वृत्ताने पांगरीसह परिसरात संतप्‍त प्रतिक्रिया उमटत असुन सोमवारी सकाळी पांगरी ग्रामस्थांनी विटंबनेचा निषेध करण्‍यासाठी दुकाने व आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेऊन शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला. राज्याच्या इतर भागात दगडफेकीच्या व जाळपोळीच्या घटना घडत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणुन पांगरी पोलिसांनी लांब पल्याच्या एस.टी.बसेस पांगरी पोलिस ठाण्याच्या प्रांगणात थांबवुन ठेवल्या होत्या. पांगरीतील आशपाक शेख, समीर शेख आदी तरूणांनी रखडलेल्या बसेसमधील प्रवांशांना अल्पोपहाराच्या नियोजनासाठी सहकार्य केले.
    रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्यावतीने सोलापुर जिल्हा संघटक सचिव रंगनाथ जानराव यांच्या नेतृवाखाली निषेधाचे निवेदन पोलिसांना देण्‍यात आले. निवेदनावर रंगनाथ जानराव, विशाल जानराव, राहुल सोनवणे, निरज गायकवाड, विकास वाघमारे, प्रताप गायकवाड, दिनेश गायकवाड, अमित गवळी, किरण जानराव, अभिजीत जानराव, अजित जानराव, दिलीप जानराव, राधे जानराव, यांच्यासह ग्रामस्थांच्या सहया आहेत.
 
Top