उस्मानाबाद :- यंदा होणार्‍या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अमृतयोग उस्मानाबादकरांसाठी येणार असल्याची शक्यता आहे. पुणे येथील अखिल भारतीय मराटी साहित्य महामंडळाच्या पथकाने मंगळवारी संमेलनासाठी आवश्यक असणार्‍या जागांची पाहणी केली. तसेच संमेलनाची मागणी करणार्‍या मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावाही घेतला. 
        मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह प्रशांत पायगुडे, सदस्य उज्वला मेहेंदळे, कुंडलिक अतकरे, प्रवीण दाते यांनी उस्मानाबाद येथे येऊन संमेलन स्थळासाठी आवश्यक असणार्‍या जागांची पाहणी केली. शहरातील लेडीज क्लब, भोसले हायस्कूल, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा परिसर, पुष्पक मंगल कार्यालय, परिमल मंगल कार्यालय आदी ठिकाणी त्यांनी भेट देऊन संमेलन स्थळासाठी पूरक असलेल्या जागांचा आढावा घेतला. महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचा भोसले हायस्कूल येथे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य डॉ. युवराज भोसले यांनी सत्कार केले. शंभर वर्षाची परंपरा असलेल्या धाराशिव नगर वाचनालयाच्या वतीनेही मंडळातील पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. उस्मानाबादकरांची आग्रही मागणी आणि संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक शाखेच्या वतीने घेण्यात आलेले परिश्रम पाहून महामंडळाचे पदाधिकार्‍यांनी आनंद व्यक्त केला. उस्मानाबाद येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे संमेलनाच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी संकेत दिले आहेत. महामंडळाने उस्मानाबादची निवड केल्यास यंदा डिसेंबर अथवा जानेवारीमध्ये होणार्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अमृतयोग उस्मानाबादकरांना अनुभवता येणार आहे. महामंडळाच्या पथकासोबत ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, कार्याध्यक्ष राजेंद्र अत्रे, सचिव बालाजी तांबे, रणजित दुरूगकर, मधुकर हुजरे, प्राचार्य पी. एन. दापके, भा. न. शेळके, किरण सगर, रवींद्र केसकर, डी. के. शेख, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.
 
Top