उस्मानाबाद :- जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त्‍ महसूल विभाग, समाज कल्याण जिल्हा परिषद, उस्मानाबाद व येडाई व्यसनमुक्ती केंद्र, येरमाळाच्या सयुंक्त विद्यमाने गुरुवार, 26 जुन रोजी महात्मा गांधी व्यसनमुक्ती ग्राम अभियानाचे  येथील  मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नियोजन समिती सभागृहात आयोजन करण्यात आले असून त्याचे उदघाटन राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सकाळी  10-30 वाजता होणार आहे.
          जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  राहणार असून  प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, समाज कल्याण सभापती दगडु धावारे आदि उपस्थित राहणार आहेत.
         गुरुवारी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते  डीपीसी हॉल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशी व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमात  व्यसनमुक्तीवरील चित्रफीत दाखविण्यात येणार असून कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
      उद्घाटन सत्रानंतर पोलीस पाटीलांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय येडाई  व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे यांचे आरोग्‍यावरील दुष्परिणाम, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडुकर यांचे  व्यसनमुक्तीसाठी पोलीसांचे  सहकार्य या विषयावर मार्गदर्शन सत्र होणार आहे. करणार आहेत. अवैध मद्यनिर्मितीचा कायदेशिर प्रतिबंध या विषयावर राज्य  उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षक एस. आर राठोड, व्यसन व अपघात यांचे संबंध या विषयावर-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. पी. मेत्रेवार, पोलीस पाटलांचे कर्तव्य व जबाबदारी या विषयावर निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांचे मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर व्यसनाच्या आहारी गेलेल्यांसाठी  अल्कोहोलिक्स अनानिमस (ए. ए. ) ची मदत या विषयावर संस्थेचे मराठवाडा व्यवस्थापक सुधीर ए. ए . यांचे मार्गर्शन होणार आहे.
        या कार्यक्रमास संबंधितानी उपस्थित रहावे, असे आवाहन अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, समाज कल्याण अधिकारी एस. के. मिनगिरे व येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. संदीप तांबारे यांनी केले आहे.                
 
Top