ताज्या घडामोडी

उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यानंतर आता घटनेचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या बदनामीचा मजकूर सोशल मिडियावर टाकून त्‍यांची विटंबना केल्‍यामुळे संतापलेल्‍या भीमसैनिकांच्‍या उद्रेकामुळे जिल्हाभरात तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ उस्मानाबादेत सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. तर येडशी येथे रास्ता रोको आंदोलन करुन या घटनेचा निषेध करण्यात आला. दरम्यान उस्मानाबादेत बंद पाळण्यात आल्याने सलग दुस-या रविवारी आठवडी बाजार भरला नाही.
    गत शनिवारी काही अज्ञात समाजकंटकाकडून फेसबुकवर छत्रपती शिवराय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या प्रतिमेचे विटंबना केल्‍यामुळे     अवघ्‍या महाराष्‍ट्रात दगडफेक आणि बंदचा प्रकार झाला होता. हा सर्व प्रकार शांत होतो न होतो तोच शनिवार दि. 7 जून रोजी रात्री फेसबुकवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे विटंबन करणारे छायाचित्र टाकल्‍यामुळे उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात तीव्र पडसाद उमटले. या प्रकाराचा सर्वत्र निषेध करण्यात आला. उस्मानाबाद शहरा सदरील प्रकाराणामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.     सकाळी सर्व भिम संघटना व सर्वपक्षीय नेत्यांनी एकतीत येवून सदरील घटनेच्या निषेधार्थ उस्मानाबाद बंदची हाक दिली. त्यावेळी सर्व व्यापा-यांनी प्रतिसाद देत आपआपली दुकाने बंद ठेवुन या घटनेचा निषेध व्यक्त केला. शहर आज दिवसभर कडकडीत बंद होते.
    याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात समाजकंटकास त्वरीत अटक करुन त्याच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच दलीत व सुवर्ण समाजामध्ये तेड निर्माण करण्याचे हे षडयंत्र असल्याचेही म्हटले आहे. या निवेदनावर रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, भाजापाचे धनंजय शिंगाडे, नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, माणिक बनसोडे, अंगुलभाऊ बनसोडे, राणा बनसोडे, संग्राम बनसोडे, सिध्दार्थ बनसोडे, प्रमोद बनसोडे, मेसा जानराव, करण वाघमारे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्ष-या आहेत.
    सदरील प्रकराचे पडसाद उस्मानाबाद जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात उमटले होते. त्यामुळे उस्मानाबादहुन बार्शी, सोलापुर कडे जाणा-या बस पुर्णत: बंद करण्यात आल्या होत्या. आज दिवसभर या मार्गावरील बस बंद ठेवल्याने प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागले. या मार्गावरील बस बंद केल्याने उस्मानाबाद बस स्थानकात मोठ्या प्रमाणात बस उभ्या करण्यात आल्या होत्या.
    रविवार असल्याने उस्मानाबादचा आठवडा बाजार असतो. फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणा-या कांही लोकांनी आठवडी बाजारात गेल्यानंतर दगडफेक करण्यास सुरूवात केली. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. मात्र ग्रामीण भागातुन आलेल्या शेतक-यांची चांगलीच तारांबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी कांही जणांना ताब्यात घेतले. तर काळा मारूती परिसरातही किरकोळ दगडफेक झाली. तसेच ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या प्रतिभा मोटर्स या हिरो होंडा मोटार्सच्या शोरूमवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. या दोन तीन किरकोळ घटना वगळता उस्मानाबादेत शांततेत बंद पाळण्यात आला.
 
Top