नळदुर्ग :- गेल्‍या दोन वर्षापासून दलित वस्‍तीचे कामे पूर्ण केली जात नसल्‍याने दोन मागासवर्गीय ग्रामपंचायत सदस्‍यानी दि. 11 जून रोजी आपला सदस्‍य पदाचा राजीनामा सरपंचाकडे दिला आहे. आणखी दोन सदस्‍य राजीनामा देण्‍याच्‍या तयारीत असल्‍याचे वृत्‍त आहे. या राजीनामा नाट्य प्रकारणामुळे अणदूर (ता. तुळजापूर) येथील पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.
    दलित स्‍मशान भूमीसाठी आलेला निधी शासनाकडे परत जाणे, तसेच गेल्‍या दोन वर्षापासून दलित वस्‍ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट रस्‍त्‍यासाठी आलेला निधी खर्च केला जात नाही. याची अनामत रक्‍कम 3 लाख 25 हजार रुपये उचलून दोन वर्षे झाले, तरीही काम पूर्ण केले जात नाही. या उदासीन धोरणामुळे ग्रामपंचायत सदस्‍य अशोक मुकरे, नागनाथ सुरवसे यांनी सरपंचाकडे लेटर हेडवर राजीनामे दिले आहे. मात्र हे राजीनामे विहीत नमुन्‍यात नसल्‍यामुळे मंजूर होतात की नाही हा प्रश्‍न समोर आहे. यापूर्वी ग्रामपंचायत सदस्‍य अॅड. विशाल शेटे यांनी असाच पध्‍दतीने राजीनामा दिला होता. मात्र तो विहीत नमुन्‍यात नसल्‍यामुळे तो मंजूर होऊ शकला नाही. एकूणच या राजीनामा नाट्यामुळे गावात उलट सुलट चर्चा सुरु आहे.
 
Top