बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- येथील लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या वतीने बार्शीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यत आले. रविवारी दि.२० रोजी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल प्रभाकर आंबेकर यांच्याहस्ते हे पुरस्कार देण्यात आले. लायन्स क्लबची बार्शी शाखेच्या वतीने मागील १६ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येतात.
    यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष कादरभाई तांबोळी, लायन्स क्लबचे अध्यक्ष विनोद बुडूख, सचिव ला.सोमनाथ पेठकर, झोन चेअरमन अमित कांकरीया ला.सागर मुक्कावार ला.अतुल सोनिग्रा ला.प्रकाश ङ्गुरडे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कारासाठी निवड झालेल्या ह.भ.प. जयवंत बोधले महाराज (अध्यात्म व समाज प्रबोधन), डॉ.नाना सामनगावकर व डॉ.डी.जी.कश्यपी (वैद्यकीय क्षेत्र) यांना जिवन गौरव, राजा माने (पत्रकारीता). व.न.इंगळे (साहीत्यीक), प्रार्थना ठोंबरे (आंतरराष्ट्रीय टेनिस पटु), अजित कुंकुलोळ (सामजिक), यांना मानाची पगडी, सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. यासह मरणोत्तर स्व.विजयकुमार माढेकर, स्व.ओमप्रकाश बाङ्गणा यांचा गौरव त्यांच्या पत्नींनी स्विकारला.
      याप्रसंगी बोलतांना माजी प्रांतपाल प्रभाकर आंबेकर म्हणाले, समाजात चांगले कार्य करणारांना लायन्स क्लब बार्शी टाऊन यांच्या वतीने पुरस्कार देण्याचा उपक्रम स्तुत्य असून, याबरोबरच सध्या गरज असलेल्या डायलीसीस तपासणी व उपचारासाठी लायन्सच्यावतीने अल्पदरात डायलीसीस सेंटर सुरु करावे. आवश्यकता भासल्यास मदत व सहकार्य करु असेही त्यांनी यावेळी म्हटले.
    ह.भ.प.जयवंत बोधले महाराज म्हणाले, प्रतिवर्षी श्रावण महीन्यात बार्शीचे गा्रमदैवत श्री भगवंत मंदिरात मागील अकरा वर्षापासून धार्मिक प्रवचनमालेत धर्मोपदेश करत असल्याने, भगवंताच्या सेवेमुळे हा पुरस्कार मिळाला आहे. हा खरा बार्शीकराचा पुरस्कार आहे. या सेवाभावी संस्थेनी दिलेला पुरस्कार हा यापुढील काळात जास्त सेवा करण्यासाठी पाठीवर दिलेली थाप असल्याचे जयवंत बोधले महाराज यानी म्हटले. प्रास्ताविकात लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष विनोद बुडूख यांनी मागील वर्षभराचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राहुल दोशी, अर्चना आवटे यांनी केले. यावेळी मराठी पाऊल पडते पुढे हा मराठी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
 
Top