बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: चुकीच्या लोकांचे ऐकल्याने तरुण पिढी भांडण मारामार्‍यांच्या नादी लागते. यात त्यांचा महत्वाचा उमेदीचा काळ वाया जातो त्यामुळे एक पिढी बरबाद होते. तरुणांनी अशा प्रकारच्या राजकिय लोकांच्या नादी लागू नये असे मत आरएसएम. समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी व्यक्त केले.
    मिरगणे यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी व उपळाई (ठोंगे) येथे क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या त्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवा सेना उपजिल्हा प्रमुख किरण गायकवाड, बिभिषण पाटील, चण्णाप्पा चौगुले, विकी जव्हेरी, सुशांत गायकवाड, पांगरी विभाग प्रमुख डॉ. विलास लाडे, अविनाश शिंदे, संभाजी आगलावे, संतोष काटे आदी उपस्थित होते
       मिरगणे म्हणाले, समाजाची दशा आणि दिशा बदलण्यासाठी आपण यापुढे शर्तीचे प्रयत्न करणार असून याकरिता युवा पिढीने सहकार्य करावे. राजकारण नको असे मनोमन वाटत असले तरी सर्वसामान्यांचे प्रश्‍न तळमळीने सोडविण्यासाठी या चिखलात उडी मारुन घाण साफ करण्याचे काम करावे लागत आहे. खेळामध्येही करिअर होऊ शकते. ग्रामीण भागातील होतकरु क्रिकेट पटूंना संधी मिळावी या हेतूने स्पर्धा आयोजनाला प्रोत्साहन दिल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हनुमान मंदीराचे सर्व बांधकाम पूर्ण करणे कौतुकास्पद आहे. उर्वरीत काममार्गी लावू. किरण गायकवाड म्हणाले, युवकांनी विधायक दिशा देणार्‍या राजेंद्र मिरगणे यांच्या नेतृत्वाची पाठराखण करावी.
 
Top