उस्मानाबाद :- दिवसेंदिवस प्रशासनात बदल होत आहेत. प्रशासन अधिक गतीमान होत आहे.  त्यामुळे नागरिकांची कामे अधिक गतीने होण्यासाठी शासन यंत्रणांनी काम करावे. दैनंदिन कामकाजात कामचुकारपणा करणा-यांची गय करु नका तसेच चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या. प्रत्येक गावांच्या एकात्मिक विकासाच्या दृष्टीने योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. 
      कार्यक्रमाच्या दरम्यान केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन त्यांना उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
      येथील जिल्हा परिषद  सभागृहात गतीमानता प्रशासकीय अभियानासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर व प्रभोदय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार आदींची यावेळी उपस्थिती होती. चारही विभागांचे उपविभागीय अधिकारी सर्वश्री प्रशांत सूर्यवंशी, रवींद्र गुरव, संतोष राऊत, सचिन बारवकर, आठही तालुक्यांचे तहसीलदार  यांच्यासह जिल्ह्यातील नायब तहसीलदार, मंडळ कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) या बैठकीला उपस्थित होते.
डॉ. नारनवरे म्हणाले की, विविध यंत्रणांनी एकमेकांना दोष देण्यापेक्षा पूरक म्हणून आणि समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. ग्रामसेवक, तलाठी भेटत नाहीत, ही अनेकदा नागरिकांची तक्रार असते. संबंधित विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी यांनी त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कामे न करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण देऊ नका. कार्यालयीन बाबी परिपूर्ण ठेवा. नागरिकांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. कार्यालय प्रमुख अथवा विभागप्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बेशिस्त कर्मचाऱ्यांबाबत कडक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरमहा विविध शासन यंत्रणांच्या प्रमुखांनी दरमहा त्या-त्या महिन्यात चांगले काम करणाऱ्या आणि कामात कुचराई करणाऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.  प्रशासन आता बदलले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही बदलले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घ्या, असे त्यांनी नमूद केले.
      अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी शासन यंत्रणांत समन्वय राहणे, महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभाग या यंत्रणांनी एकत्रितपणे गावावगावंत जाऊन त्यांच्या समस्या समजावून घेणे व सोडवणे, विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहेचविणे आवश्यक असल्याचे सांगितले.
 
Top