उस्मानाबाद -: भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या पत्रान्वये दि.31 मे,2014 द्वारे दिनांक 1 जानेवारी,2014 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि.9 जून,2014 ते 31 जुलै,2014 या कालावधीमध्ये राबविण्याचे आदेशित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कळविले आहे.
     या कार्यक्रमाचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे व कालावधीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दि.9 जून, 2014- प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी, दि.9 जून,2014 (सोमवार) ते 30 जून,2014 (सोमवार)- दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी, दि.21 जून (शनिवार),दि.22 जून (रविवार), दि. 28 जून (शनिवार) आणि 29 जून (रविवार) -विशेष मोहिम. दिनांक 15 जुलै,2014 ( मंगळवारपर्यंत) - दावे व हरकती निकालात काढणे, दि. 25 जुलै,2014(शुक्रवारपर्यंत) - डाटाबेसचे अद्ययावतीकरण करणे. दिनांक 31 जुलै,2014 (गुरुवार) -- अंतिम मतदार यादी प्रसिध्दी. 
    तेव्हा जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी ज्यांची नावे मतदान यादीमध्ये समाविष्ट झालेली नसतील त्यांनी तात्काळ फॉर्म नंबर-6 भरुन नजीकच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा नजीकच्या सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांचेकडे रितसर सादर करावेत, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले आहे.
    या कार्यक्रम विशेष तत्वाने राबविण्यात येत आहे.  यामध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था/संघटना, प्राचार्य/मुख्याध्यापक कॉलेज/शाळा यांनीही मतदार नोंदणीबाबत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केल्याचे श्री. मुळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.    
 
Top