वैराग (महेश पन्‍हाळे) -: संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होऊन तब्बल ५४ वर्षाचा काळ लोटला त्यावेळची भोगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, लोकसंख्येच्या मानाने गरजा अपु-या होत्या. पण जसजसा काळ गेला तसतसा मानवी गरजा वाढू लागल्या. त्यामुळेच भारतात स्वातंत्र्या नंतर अनेक  राज्ये निर्माण झाली तसेच महाराष्ट्रात अनेक जिल्हे व तालुके निर्माण झाले. परंतु राजकीय अनास्थेमुळे पन्नास वर्षापासून मागणी असलेला वैराग तालुका काय निर्माण झाला नाही?  आता ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्हा निर्माण होऊ लागला आहे. त्यानिमित्ताने वैराग तालुका निर्मिती सुध्दा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे .
       वैराग तालुका निर्माण व्हावा म्हणून सन १९४९ पासून मागणी करण्यात येत आहे. आता पर्यंत विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून भागातील नेते मंडळींनी, अनेक सामाजिक संघटना, सर्वसामान्य नागरिकांनी विविध प्रकारची आंदोलने केली आहेत .
      १९५१ साली मुरारजी देसाई वैराग येथे आले होते. त्यावेळी पहिल्यांदा वैराग तालुका निर्मितीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ११ एप्रिल १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा मंगलकलश पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना याचा वैरागच्या भूमीवर सुपूर्त केला होता. त्यावेळच्या कार्यक्रमात तत्कालीन महसूल मंत्री राजाराम बापू पाटील यांनी वैराग तालुका निर्मितीची घोषणा केली होती. त्यानंतर १६६८ साली महसूल मंत्री बाळासाहेब देसाई यांनी वैराग तालुका निर्मितीची घोषणा केली. यात सर्व पक्षीय नियोजित वैराग तालुका कृती  समितीने तत्कालीन महसूल मंत्री कै. विलासराव देशमुख यांना १६ – ६- १९९३ रोजी पत्र देवून तालुका करावा अशी मागणी केली होती. त्या पत्रावर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार कै भाई चंद्रकांत निंबाळकर, सोलापूर जिल्हा कांग्रेस ( आय ) चे माजी जिल्हा चिटणीस कै. धन्यकुमार भूमकर यांच्या स्वाक्ष-या होत्या. 
         अनेक वेळा रास्तारोको , चक्री उपोषण ,गावबंद अशी अनेक आंदोलने झाली. शेवटी चाळीस वर्षाची तपश्चर्या बाजूला ठेवून युती शासनाच्या काळात माजी आमदार चंद्रकांत निंबाळकर यांनी शेतकरी कामगार पक्षाचा त्याग करून केवळ वैराग तालुका निर्माण व्हावा म्हणून शिवसेनेत प्रवेश केला .यावर कडी म्हणजे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी वैरागला२४-१-१९९८  आले त्यांनी मोठ्या गाजावाजा करून वैराग तालुका झाला अशी घोषणा सुध्दा केली पण आठच दिवसात मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि वैराग तालुका निर्मितीचे घोंगडे भिजतच राहिले   त्यानंतर धन्यकुमार भूमकर यांनी मा . अपूर्व चंद्रा तत्कालीन जिल्हाधिकारी सोलापूर यांना ६-२-१९९९ रोजी पत्र देवून वैराग तालुका निर्मितीच्या प्रशासनाच्या इमारती बाबत खुलासा करून इमारती साठी जागा उपलब्ध असल्याचे कळविले होते ,तसेच बार्शी तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुख सुनंदा जावळे यांनी  ७-६-१९९९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांना पत्र देवून युती शासनाच्या तत्कालीन मुख्यमंत्री जोशी यांच्या घोषणेची आठवण करून दिली .युती शासनाच्या काळात सुध्दा अनेक तालुके निर्माण झाले पण वैराग तालुका निर्मितीचा विसर पडला.          
 
Top