वैराग (महेश पन्‍हाळे) :- भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेची विटंबना केल्‍याच्‍या निषेधार्थ वैराग (ता. बार्शी) येथे कडकडीत बंद पाळण्‍यात आला. वैराग पोलिसांनी योग्‍य नियंत्रण ठेवत कुठेही अनुचित प्रकार होऊ दिला नाही.
             महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबुकवर विटंबना करण्‍यात आल्याचे वृत्‍त वैरागमध्‍ये पसरताच घटनेचे पडसाद बाजारपेठेवर उमटले. दिवसभर बाजारपेठ आणि आ‍र्थिक व्‍यवहार बंद ठेवत वैरागमध्‍ये कडकडीत बंद पाळण्‍यात आला. पोलिसांनी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्‍त ठेवला होता. या बंदमुळे एकरी वाहतूक पुणर्तः कोलमडली. या वैराग बसस्‍थानकातून जाणा-या आणि येणा-या अशा 192 फे-या एस.टी. विभागाच्‍या रद्द कराव्‍या लागल्‍या. त्‍यामुळे ग्रामीण भागातून येणा-या जाणा-या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. वैराग येथील किराणा, कापड दुकान, सराफ, हॉटेल, आडत आदी लहान-मोठी दुकाने दिवसभर बंद राहिली. या घटनेचा विविध संघटना, सामाजिक संस्‍था, सर्व पक्षांच्‍यावतीने बाजारपेठ बंद ठेवत निषेध व्‍यक्‍त केला.
     दरम्‍यान, आंदोलनकर्त्‍यानी अनेक ठिकाणी एस.टी. बसेसची तोडफोड केल्‍याचे कळताच वैराग बसस्‍थानकामध्‍ये सुमारे वीस एस.टी. गाड्या उभ्‍या ठेवल्‍या. यामुळे बार्शी-सोलापूर मर्गावरील 103 फे-या, करमाळा 2, उस्‍मानाबाद-तुळजापूर 26, कुर्डवाडी 14, ग्रामीण 47 अशा 192 फे-या रद्द केल्‍या. त्‍यामुळे प्रवाशांसोबत एसटी वाहक, चालकही बसस्‍थानकाच अडकून पडले. सगळी हॉटेल्‍स् बंद असल्‍याने त्‍यांना उपासमारीस सामोरे जावे लागले. या घटनेमुळे पोलीस निरीक्षक मधुकर पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्‍तात्रय कदम यांनी चोख बंदोबस्‍त ठेवला होता.
 
Top