नळदुर्ग  -: येथील नियोजित 50 खाटाचे उपजिल्हा रुग्णालयाच्या भव्‍य इमारत बांधकामाचा शुभारंभ पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते सोमवार दि. 14 जुलै रोजी होत आहे. नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांसह राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना या उपजिल्हा रुग्णालयामुळे दिलासा मिळणार असल्‍याने नागरिकांतून समाधान व्‍यक्‍त केले जात आहे.
    नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, गरीब नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांनी शासन दरबारी विशेष प्रयत्न करुन नळदुर्ग येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजूरी आणली होती. त्‍यानंतर उपजिल्हा रुग्णालय उभारणीसाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी परत गेला होता. त्यामुळे नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली होती. दरम्यान मध्यंतरीच्या काळात ना. चव्हाण यांनीच नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी लागणारी जवळपास पाच एकर जमीन शासनाकडून उपलब्ध करुन घेतली. जमीन उपलब्ध झाली मात्र उपजिल्हा रुग्णालय उभारणीसाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी परत गेल्याने उपजिल्हा रुग्णालय उभारणीचे काम रेंगाळत पडले होते. मात्र पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करुन ना. चव्हाण यांनी नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकामासाठी व वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचा-यांचे निवासस्थान बांधण्यासाठी शासनाकडून तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणले.
    पालकमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे नळदुर्गात मोठ्याप्रमाणावर विकास कामे होत आहेत. रामतीर्थजवळ सुमारे ८० कोटी रुपये खर्चून उच्च पातळीचा बंधाराही त्यांच्या पाठपुराव्यामुळेच उभारला जात असून आजअखेर या बंधा-याचे काम प्रगतीपथावरे आहे. या बंधा-यामुळे नळदुर्ग शहर व परिसरातील शेतक-यांच्‍या सर्वांगीण विकासास मदत होणार आहे. त्‍याचबरोबर ऐतिहासिक शहराकडे पर्यटक जास्तीत जास्त संख्येने आकर्षिले जावेत यासाठी ऐतिहासिक किल्ल्याचा विकास करण्याबरोबरच राज्य शासनाने हा किल्ला बीओटी तत्वावर चालविण्यास द्यावा, यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आहेत. याबरोबरच शहरात मागासवर्गीय मुलांचे  वसतीगृह मंजूर करुन आणले आहे. शहराचा सर्वांगीण विकास व्‍हावा, याकरीता ना. चव्‍हाण यांनी नगरपालिकेला मोठ्याप्रमाणावर भरीव निधी उपलब्‍ध करुन दिले आहे. पाणीटंचाईच्‍या काळातही नळदुर्ग शहरात पाणीटंचाई जाणवली नाही. नळदुर्ग येथे सुसज्जित नवीन बसस्‍थानकाच्‍या इमारतीचे बांधकाम पुर्णत्‍वाच्‍या मार्गावर आहे.
 
Top