उस्मानाबाद :- राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील जळकोट, जळकोटवाडी, मुर्टा, होर्टी, चिकुंद्रा आदि गावांना भेटी देवून शासनामार्फत जनतेच्या हितासाठी राबविण्यात  येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. गावकऱ्यांनी योजनाबाबत करत असलेल्या कामे व अडचणीं सांगितल्या. नागरिकांच्या हिताच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी पदाधिकारी व अधिकारी यांनी  सवोतोपरी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी  केले. 
     यावेळी त्यांच्यासमवेत प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, जि. प. चे कृषि सभापती पंडित जोकार, तुळजापूर पं. स. चे उपसभापती प्रकाश चव्हाण, दिलीप सोमवंशी, गटविकास अधिकारी व्हि. के. खिल्लारे, नायब तहसीलदार श्री. वाघे, धनंजय रणदिवे यांच्यासह संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
    पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, शासनाच्या  विविध योजना जनतेच्या  हितासाठी राबविल्या जातात. नैसर्गिक आपत्तीत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना शासनाने भरीव मदत दिली आहे. शासनाच्या योजना राबविताना प्रामुख्याने ग्रामपंचायत व पदाधिकारी यांनी पुढे येवून कामे केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
    चिकुंद्रा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कै. यादवरावजी गायकवाड विश्वस्त मंडळाने सत्कार आयोजित केला होता. यावेळी यशोदा गायकवाड व पुजा गायकवाड  या विद्यार्थींनीचा पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते स्मृतीचिंन्ह  देवून सत्कार करण्यात आला.
     यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, या मुलींनी गावाचा नाव लौकिक केला आहे. याप्रमाणेच इतर विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करुन आपल्या गावाबरोबरच देशाचे नाव लौकिक करावा. या विद्यार्थ्यांना ज्या शिक्षकांनी घडविले त्यांचे देखील अभिनंदन चव्हाण यांनी केले.
    गावोगाव वृक्षारोपण करुन आपला परिसर प्रदुषण मुक्त करावा. त्याचप्रमाणे आपले गाव हागणंदारीमुक्त व व्यसनमुक्त गाव करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांच्या हस्ते चिकुंद्रा येथे आमदार निधीतून 5 लाख 50 हजार रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या श्री.विठल रुख्मिनी मंदिर व सामाजिक सभागृहाचे उदघाटन व रस्त्याचे भुमीपूजन त्यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी पं.स.सदस्य प्रकाश भोसले, स्वातंत्र्य सेनानी पाडुरंग दादा, खराडे सिद्राम अप्पा, सरपंच व उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.  
 
Top