बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: कासारवाडी (ता.बार्शी) येथील योगीराज वेदविज्ञान आश्रमात यज्ञांचा राजा म्हणून परिचित असलेल्या ऐतिहासिक साग्निचीत अश्वमेध महासोमयाग यज्ञ मागील अठरा महिन्यांपासून सुरु होता. याची सांगता संतपूजनाने करण्यात आली. तत्पूर्वी उडत्या गरुडाच्या यज्ञवेदीवर पूर्णाहुती देण्यात आली अशी माहिती वेदविज्ञान आश्रमाचे संचालक नारायण उर्फ नाना काळे व दिक्षीत केतन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुरुवातीस बळेवाडी येथील स्वामी समर्थ मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला. यानंतर माधवतीर्थ स्वामी (आनंद तीर्थ गुजरात), चेतनाविलास स्वामी (मुंबई), वासुदेव निवासचे उत्तराधिकारी शरदराव जोशी (पुणे), अग्निहोत्राचे प्रचारक मोहन काका जाधव (अमेरिका), सनातन संस्थेच्या अंजलीताई गोडबोले (गोवा) या पाच प्रमुख संतांची हत्ती, घोडे, रथ यासह सवाद्य मिरवणूक आश्रमापर्यंत काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वेधशाळेतील विद्यार्थ्यांनी चारही वेदांचे शांतीपाठ करण्यात आले. आश्रमाचे प्रमुख नारायण गोविंद तथा नाना काळे यांनी प्रास्ताविक केले. यचवेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रसाद सहस्त्रबुध्दे यांच्या समुहाने पारिप्लव आख्याना गायले. संतांची विधीवत पूजा के.एस.माळी (सांगोला), योगेश काळे (कासारवाडी), वे.मु.प्रविण देशपांडे (हैद्राबाद), सुनिल अग्रवाल, श्री केंद्रे (अंबाजोगाई) यांनी केली. यावेळी आशीर्वचन व त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विक्रम घोडके, आभार चैतन्य काळे यांनी मानले. उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ब्राह्मण महासभेच्या प्रमुखांनी विशेष प्रयत्न केले.
 
Top