बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शेगावचे संत श्री गजानन महाराज पालखीचे बार्शीत आगमन होताच बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावर शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष कादर तांबोळी, तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन स्वागत केले.
    याप्रसंगी पालखीच्‍या स्‍वागताप्रसंगी राष्‍ट्रवादीचे गटनेते नागेश अक्‍कलकोटे, नगरसेवक रमेश पाटील, अंबादास शिंदे, दत्‍तात्रय शिंदे आदीजण उपस्थित होते. शहरातील रामेश्‍वर मंदीर येथे प्रसन्‍नदाता गणेश मंदीर ट्रस्‍टच्‍यावतीने पालखीतील वारकरी संप्रदायास भोजन देण्‍यात आले. यावेळी मोठ्या संख्‍येनी महिलांनी पालखीचे दर्शन घेतले. गण गण गणात बोते, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत, बँड पथक, घोडे, हत्‍ती यासह श्रींची पालखी शहरातील पोस्‍ट ऑफिस चौक, तेलगिरणी चौक, ऐनापूर मारुती रोड, पान खुंट, पटेल चौक, चाटी गल्‍ली, महाद्वार चौक मार्गे भगवंत मंदिराजवळील अग्‍नीशमन विभागाच्‍या जागेवर विराजमान करण्‍यात आली. शहरातून पालखी जात असताना भक्‍तांनी मोठ्या संख्‍येनी दुतर्फा गर्दी करुन दर्शनाचा लाभ घेतला.             शहरासह तालुक्‍यातील हजारो नागरीक भक्‍तीमय वातावरणात श्रींच्‍या दर्शनासाठी भगवंत मंदीराजवळ जमा झाले होते. पालखीचे 47 वे वर्ष असून बुधवारी पालखी भूमकडे रवाना होत आहे. यावेळी विविध सामाजिक संस्‍थांनी वारक-यांना विविध वस्‍तूंचे वाटप केले. पोलीस निरीक्षक सालार चाऊस, स.पो.नि. सुरेखा धस, अतुल भोस यांचे सह पोलीस कर्मचा-यांनी मोठा बंदोबस्‍त तैनात केला होता.
 
Top