बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: लिंगायत समाजाला ओबीसीचा दर्जा, राज्यातील लोकसंख्येच्या आधारावर अल्पसंख्यांक दर्जा, स्वतंत्र धर्माची मान्यता आदी विविध मागण्यांसाठी समाजबांधवांनी बार्शी तहसिलवर मोर्चा काढला.
    यावेळी वीरशैव तथा लिंगायत समाज बांधवांची ओळख असलेल्या तसेच धार्मिक संस्कारावेळी वाजविण्यात येणारे संभळ आणि शंख या वाद्याने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. आडवा रस्ता येथील सतरावा पुठ्ठा गणपती मंदिरातून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली, आडवा रस्ता, रोडगा रस्ता, ऐनापूर मारुती रोड, कापड बाजार, किराणा रोड, सोमवार पेठ, पांडे चौक मार्गे बार्शी तहसिलवर हा मोर्चा वळविण्यात आला.
    याप्रसंगी डॉ.सूर्यकांत घुगरे, सोमेश्वर घाणेगावकर, विलास रेणके आदींनी समायोचित विचार व्यक्त केले. यावेळी तहसिलदार बालाजी सोमवंशी यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी धनंजय धारुरकर, अनिरुध्द चाटी, रविंद्र मेनकुदळे, बाळासाहेब आडके, बाबासाहेब कथले, नंदकुमार होनराव यासह शहर व तालुक्यातील लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
Top