उस्मानाबाद :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी असल्याने आता जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी थेट तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात जाऊन नागरिकांचे प्रश्न समजावून घेण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या तालुकास्तरीय फिरत्या लोकशाही दिनाचा उपक्रम नुकताच लोहारा येथे पार पडला तर आता दि. 16 जुलै रोजी तुळजापूर येथे तर दि. 19 रोजी वाशी येथे हा उपक्रम तेथील तहसील कार्यालयात होणार आहे.
     प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तराव लोकशाही दिनाचा उपक्रम आयोजित करण्यात येतो. तालुकास्तरीय लोकशाही दिनात प्रश्न मांडूनही त्याचे निराकरण झाले नसल्याने काहीजण या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात हजेरी लावतात. मात्र, या लोकशाही दिनाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आणि नागरिक शासकीय यंत्रणेविषयी त्यांच्या अडचणी, प्रश्न मांडण्यासाठी पुढे येत नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. जिल्हास्तरावरील विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यादिवशी तहसील कार्यालयात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणीच नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविणे आणि त्यादृष्टीने कार्यवाही करणे सोपे जाणार आहे.
     संबंधित तालुक्यातील नागरिकांनी कागदपत्रांसह आणि यापूर्वी केलेल्या पाठपुराव्यांसह त्यांचे प्रश्न, अडचणी यावेळी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.      
 
Top