उस्मानाबाद :- जिल्ह्याचा ऐतिहासिक वारशाचे जतन आणि  संवर्धन करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. जिल्ह्याच्या इतिहासाशी निगडीत असणारी माहिती संकलित करण्याच्यादृष्टीने उपजिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहासलेखनाचा हा उपक्रम हाती घेतला असून जिल्ह्यातील इतिहास तज्ज्ञ, अभ्यासक, इतिहासप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही त्यांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवावा आणि जिल्ह्याच्या इतिहासाविषयी माहिती, संकलन, संदर्भ साहित्य, वस्तू असतील तर त्याची माहिती दयावी, असे आवाहन केले आहे. याशिवाय, जिल्ह्याचा इतिहास दर्शविणारे एक संग्रहालयाची निर्मितीही करण्यात येणार आहे.
    नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यासंदर्भात बैठक घेऊन यासंदर्भातील प्रारुप आराखडा कसा असावा, याबद्दल विविध मान्यवरांशी चर्चा केली.  अभ्यासकांनीही स्वताहून पुढे यावे आणि जिल्हा इतिहासाशी निगडीत माहिती द्यावी. या इतिहास लेखनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अपर जिल्हाधिकारी जे.टी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर या इतिहास लेखन कामाच्या समन्वयक म्हणून  काम पाहात आहेत.
    सध्या प्राथमिक स्तरावर संदर्भ साहित्य संकलन, भाषांतर, मसुदा लेखन, वास्तु, छायाचित्रे व नकाशे संकलन, स्थानिक संसाधन, नियोजन अशा विषयांनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधयक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. सतीश कदम, जयश्री कुलकर्णी, भुजंग बोबडे यांच्यासह उर्दू, मोडी भाषा जाणणारे अभ्यासक यावेळी उपस्थित होते.
    जिल्ह्याच्या इतिहास लेखनाच्या माहितीसंदर्भात आर्किओलॉजीकल सोसायटी ऑफ इंडिया यांची औरंगाबाद व मुंबई शाखा, राज्य पुराभिलेखागार, हैद्राबाद येथील आंध्र प्रदेश सरकारचे ग्रंथालय तसेच डेक्कन आर्किओलॉजीकल कल्चरल सेंटर, उस्मानिया विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, भारत इतिहास संसोधक मंडळ, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे ग्रंथालय, नॅशनल म्युझियम, बिकानेर संग्रहालय, दिल्ली विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद,  लंडन म्युझियम, सेंट्रल लायब्ररी मुंबई, आंध्र प्रदेश शासकीय ओरिएंटल मैन्युस्क्रिप्ट लायब्ररी, हैद्राबाद, पेशवे दफ्तर, सोलापूर विद्यापीठ यासह विविध संस्था आणि ग्रंथालयांशीही संपर्क साधून जिल्ह्याच्या इतिहासाविषयीची माहिती संकलित केली जाणार आहे.
    प्रत्येक नागरिकांच्या दृष्टीने जिल्ह्याचा इतिहास हा महत्वपूर्ण ठेवा असल्याने त्यांनी यासंदर्भातील वस्तू, कागदपत्रे, संकलन उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.     
 
Top