उस्मानाबाद -: भारत हा कृषि प्रधान देश असून जागतिक स्तरावर शेतीचे महत्व वाढत आहे.शेतीमध्ये नव-नवीन तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतीतील उत्पादकता व उत्पादन वाढत आहे. या वाढत्या उत्पादकतेचा वापर तरुण शेतक-यांनी आपल्या ऊस पिकांच्या क्षेत्रामध्ये कांदा व बटाटा लागवड करुन अंतरपीक घ्यावे, असे प्रतिपादन आयुक्त कृषी डॉ. उमाकांत दांगट यांनी केले.
नॅचरल शुगर साई नगर, रांजणी ता. कळंब येथे आत्मातंर्गत सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून एकात्मिक कृषि विकासासाठीच्या कांदा व बटाटा लागवड योजनेच्या एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नॅचरल शुगरचे चेअरमन बी.बी.ठोंबरे, विभागीय कृषी सहायक संचालक के.एन.देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, श्री.मोटे, श्री. गायकवाड, आत्माचे प्रकल्प संचालक श्री. लोखंडे, श्री.बावीसकर, श्री. चांदवडे, उप विभागीय अधिकारी श्री.बिराजदार, कृषि उपसंचालक श्री. मनियार, उस्मानाबादचे प्रकल्प उपसंचालक श्री.चोले, लातूरचे श्री.मोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ.दांगट म्हणाले की,सध्याची शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. त्या वातावरणानुसार शेतीचा वापर करुन शेती केल्यास शेतकऱ्यांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करुन देणारी आहे. शेतीमधील जोखीम व्यवस्थापनासाठी ऊसाच्या पिकाबरोबरच कांदा व बटाटा ही अंतरपीक घेणे काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्याला ऊसाबरोबरच या उत्पन्नाचा साधन मिळून आर्थीक उत्पन्नात वाढ होईल. या पिकाच्या लागवडीसाठी शासनामार्फत अनुदान देण्यात येते, याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कांदा व बटाटा पिकाची लागवड करतांना 5 ते 7 फुट अंतरावर ऊसाची लागवड करुन त्यात कांदा किंवा बटाटा अंतर पीक म्हणून घ्यावे. या पिकाच्या उत्पादन व साठवणूकीसाठी प्रक्रिया प्रकल्प उभारावे. या पिकांच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी 100 शेतक-यांच्या गटांची स्थापना करण्याचे आवाहन श्री. ठोंबरे यांनी केले.
या कार्यशाळेस राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री.फुले, सल्लागार डॉ.कापसे, आत्माचे संचालक के.व्ही.देशमुख, कांदा पीक तज्ञ किशोर वीर आणि बटाटा पीक तज्ञ डॉ. नानकर यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषी आयुक्त डॉ. दांगट यांनी सारोळा व पाडोळी येथील पॉलीहाऊस (फुलशेती) भेट देऊन पाहणी त्यांनी केली. त्यांच्यासमवेत संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
आत्मातंर्गत किसान क्रांती फार्मर ग्रुप, तांदुळजा चे अध्यक्ष श्री मोहिते विष्णू, विठ्ठल साई,टाकळगांव , श्री. कदम ज्ञानोबा, सावता माळी ,रांजणी, श्री. काळदाते लहू, श्री साई, सौंदणा अंबा, श्री पालकर विलास, हनुमान, लासरा, श्री शेळके लक्ष्मण, शेतकरी राजा,लोहटा पु चे टोमणे दिलीप तर बळीराजा फॉर्मर ग्रुप, पाडोळीचे पाटील शरद या शेतकऱ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात गट प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडूरंग आवाड यांनी तर आभार नॅचरल शुगरचे प्रवर्तक दिलीप भिसे यांनी मानले.या कार्यशाळेस जिल्ह्यातील कृषी अधिकारी आणि शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.