तुळजापूर :- नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देवून शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपतीत शेतीचे नुकसान झाले त्या शेतकऱ्-यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करुन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले. पालकमंत्री चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील शहापूर गुळहळळी, केशेगाव लमाणतांडा आदि गावानां भेटी देवून विविध विकास कामाचे भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती पंडीत जोकार, तुळजापूर पं. स. उपसभापती प्रकाश चव्हाण, सहायक गट विकास अधिकारी चकोर, नायब तहसीलदार वाघे, वीज मंडळाचे सहाय्यक अभियंता कमलमोर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते शहापूर येथे अंतर्गत रस्त्याचे भुमीपूजन, केशेगाव, लमानतांडा येथ नागरिकांना धार्मीक कार्यक्रम घेण्यासाठी बांधण्यात येणा-या सभागृहाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, शासनाच्या विविध विकासाच्या योजना जनतेच्या सुख-सुविधेसाठी राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने घरकुल योजना, राजीव गांधी जीवनदाई योजना, वयोवध्दांना पेन्शन योजना, शिक्षणसाठी सवलत, पेयजल योजना, शेतक-यांसाठी कृषी योजना, विज देयकात 50 टक्के सवलत अशा अनेक योजना नागरिकांना देण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी सांगीतले. यावेळी येथील बंजारा समाजाच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे.
चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात मिळणे गरजेचे असते. त्यासाठी पाणीसाठवणूक करण्यासाठी तळे बांधणे, बंधारे गरजेचे असते. गावकरी व शेतक-यांच्या कल्याणासाठी शासन जमिनी ताब्यात घेवून साठवण तलाव व रस्ते करणे क्रमप्राप्त असते. तेंव्हा गावक-यांनी एकत्र येवून गावच्या विकासाच्या कार्यात सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक गावात विज मंडळ, महसूल मंडळ यांनी कॅम्प लावून तेथील नारीकांचे प्रश्न निकाली काढावेत, असेही त्यांनी शासकीय यंत्रणेला निर्देश दिले. यावेळी विविध गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.