पांगरी (गणेश गोडसे) :- अगोदरच सलग चार वर्ष साडेसातीच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतक-यामागचा ससेमिरा कांही केल्या थांबण्यास तयार नाही. दुष्काळामुळे डोळयात पाणी आलेल्या शेतक-यांच्या अश्रुच्या धारा कांही केल्या थांबण्यास तयार नाहीत. गारपीठ अवकाळी पाऊस दुष्काळी स्थितीमुळे पुरता हतबल झालेल्या बळीराजासमोर पेरलेले बियाने न उगवण्याची नविनच समस्या सोयाबिन उत्पादक शेतक-यांसमोर उभी राहिली आहे.हजारो रूपये पेरणी करूनही उगवण होत नसल्यामुळे शेतक-यांच्या डोळयासमोर दिवसा काजवे चमकु लागले आहेत.
नुकतेच बुधवारी शेलगांव (ज) ता.कळंब येथील सर्वसामान्य शेतक-यांने सोयाबिन न उगवल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे कंपन्या व प्रशासनासंदर्भात शेतकरी किती त्रागा करत आहे याचा अंदाज येऊ शकतो. शेतक-यांनी पेरणी केलेल्या सुटया घरगुती सोयाबिनसह नामांकित कंपन्यांचेही बियाने उगवत नसल्यामुळे सोयाबिन उत्पादक शेतक-यांना हजारो रूपयांचा फटका सहन करावा लागत असुन पेरणी करूनही उगवन न झाल्यामुळे शेतक-यांना लाखो रूपयांचा फटका सहन करावा लागणार आहे. शासनाच्या संबंधित विभागाने याबाबत पाहणी करून शास्त्रज्ञांकडुन माहिती घेऊन अहवाल सादर करू असे ठराविक उत्तर दिले. सोयाबिनची उगवण होत नसल्यामुळे कंपनीचे अधिकारी, कृषी खात्याचे अधिकारी, खत व बियाणे विक्रेते हे वेगवेगळी कारणे सांगत आहेत. एक मात्र सत्य हे की, एकुणच यात फक्त अगोदरच कंगाल झालेला शेतकरीच नागावला जात आहे. अलिकडील कांही वर्षात सोयाबिन हे बार्शी तालुक्यात महत्वाचे व नगदी पिक म्हणुन उदयाला आले आहे. तीन महिन्यात हातात पैसै खेळत असल्यामुळे बहुतांश शेतक-यांचा याकडेच ओढा वाढत आहे. कंपन्या याचाच फायदा घेत जुनेच बियाणे नविन पॅकिंगमध्ये बाजारपेठेत आणुन शेतक-यांची फसवणुक करत आहेत. अगोदरच निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे हंगाम दिड महिना पुढे सरकला असतानाच पुन्हा हे वेगळेच संकट समोर उभे राहील्यामुळे परिस्थती बिकट होत आहे.
बार्शी तालुक्यातील पांगरी, पांढरी, गौडगांव, आगळगांव, कुसळंब, चिखर्डे, उक्कडगांव, घारी, पुरी या गांवांसह येडशी, शेलगांव, येरमाळा आदी भागातही जेमतेम अशीच स्थिती आहे. दुष्काळामुळे व आर्थिक चनचनीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी चिंतातुर अवस्थेत पोहचला आहे. आता पुढे काय? असा यक्ष प्रश्न सध्या शेतक-यांसमोर उभा राहीलेला आहे. सोयाबिन विक्रेत्या कंपन्यांनी गारपीठ, अवकाळी पाऊस आदींमुळे उपजनक्षमता कमी झालेले निकृष्ठ दर्जाचे बियाणे बाजारपेठत विक्री करून कोटयावधी रूपये कमाई करून शेतक-यांना मातीमोल करून टाकले आहे. त्यामुळे कंपन्यासंदर्भात शेतक-यांमधुन तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
" अगोदरच दुष्काळामुळे बिकट परिस्थतीमधुन मार्ग काढुन उसनवार करत हजारो रूपये सोयाबिनची पेरणी केली. मात्र ८० टक्के बियानेच उगवले नसल्यामुळे कंपन्याबाबत तिरस्कार निर्माण झाला असुन संबंधीत कंपन्यांनी शेतक-यांना मोफत बियानांचे पुर्नवाटप करुन नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. पांगरी जवळील पांढरी येथे भानुदास सोपान घावटे, बापुसाहेब घावटे, विलास पांडुरंग घावटे, रामदास प्रल्हाद घावटे आदी शेतक-यांनी नामांकित बियानांची पेरणी करूनही बियाणे उगवलेले नसल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी आहेत. "
- विष्णु घावटे, सोयाबिन उत्पादक पांढरी
" सोयाबिनची उगवण होत नसल्याबाबत बार्शी तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी यांच्याकडुन माहिती घेतली असता, बार्शी तालुक्यातील गौडगांव झाडी बोरगांव या भागातील शेतक-यांनी कंन्यांतर्फे खरेदी केलेल्या सोयाबिनची उगवण झाली नसल्याबात कार्यालयांकडे लेखी तक्रार दिली असुन शनिवारी दि.१९ रोजी संबंधीत कंपन्यांचे प्रतिनिधी कृषी खात्याचे पथक व शास्त्रज्ञ संयुक्तरित्या संबंधीत शेतक-यांच्या शेतात जाऊन पाहणी करून बियाणे पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करू असेही ते म्हणाले." -श्रीधर जोशी, तालुका कृषी अधिकारी :-
