बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: एस.टी.बस नुकसानीत जात असल्याचे कारण दाखवून काही डेपो बंद करण्याचे धोरण प्रशासन राबवित आहे. सदरच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी राज्यभरातून एस.टी.बस कामगार संघटना आंदोलन करीत आहेत. बार्शीतील महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या शाखेने धरणे आंदोलन करुऩ निषेध नोंदविला.
यावेळी संघटनेचे डेपो अध्यक्ष हेमंत साठे, जे.बी.जाधव, बाळासाहेब कदम, जयसिंग परदेशी, राजेंद्र साखरे, पी.टी.पाटील, प्रशांत दराडे, पृथ्वीराज चव्हाण, विजयकुमार स्वामी, विवेकानंद रुपनवर यांसह अनेक कामगार व महिला कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात १० वर्षांपासून नुकसानीत असलेल्या ५८ पैकी विठ्ठलवाडी डेपा बंद करण्याचा शासनाचा निर्णय रद्द करावा, पूरक प्रवासी वाहतूकीच्या नावाखाली खाजगी वाहनांना परवाना देण्याचा प्रस्ताव रद्द करावा, प्रवासी कराची रक्कम महामंडळास द्यावी, तोट्यातील डेपोच्या नियतांचे उत्पन्न वाढीसाठी शासन, महामंडळ व संघटनेची संयुक्त बैठक घ्यावी, अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणावे, शासनाकडून देय असलेले १३४० कोटी त्वरीत रोख द्यावे, सर्व मार्गावरील पथकर रद्द करावा, अन्य राज्याप्रमाणे प्रवासी करात सूट द्यावी, नुकसानीच्या मार्गावरील बस सेवेची प्रतिपूर्ती करावी, महामंडळाच्या आर्थिक विकासासाठी सहाय्य, उपोषण आंदोलनामुळे ८ दिवस वेतन वसूलीचा निर्णय रद्द करावा, कामगार कराराची उर्वरित देय थकबाकी द्यावी, करार कायदे परिपत्रकांचा भंग करणारे निर्णय रद्द करावे आदी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये लक्ष वेधण्यासाठी सर्व आगार व घटक यांच्या गेटसमोर धरणे आंदोलन, यानंतर ५ ऑगस्ट रोजी विभागीय अथवा मध्यवर्ती कार्यशाळेतील गेटसमोर, त्यानंतर दि.१२ ऑगस्टरोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये प्रवासी वाहतुकीस कोणताही अडथळा न येता आंदोलन करण्यात येणार आहे.

 
Top