उस्मानाबाद :- अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले्ल्या उस्मानाबादच्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांच्याकडे ९१ लाखांहून अधिक बेहिशेबी मालमत्ता मिळाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीतून समोर आले आहे. परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर आदी ठिकाणी छापे मारून त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली. या झडतीत सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांच्याकडे सुमारे पाऊण कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील विविध बँकांमधील लॉकर्स, पोस्ट ऑफिस, एफडीच्या माध्यमातून त्यांनी ही गुंतवणूक केली आहे.
हिंगोली येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेत ३० लाख १५ हजार २१३ रुपयांची ठेव, परभणी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत एक लाख ७९ हजार रुपये, राहत्या घरी १६ लाखांची रोकड आणि ३० तोळे सोने, बीड पोस्ट ऑफिसमध्ये चार लाख ५० हजारांची मासिक उत्पन्न गुंतवणूक, तसेच दोन लाख ५५ हजारांची रोख रक्कम, २० लाख रुपयांची विविध ठिकाणी गुंतवणूक अशी अंदाजे ७२ लाखांहून अधिक बेहिशेबी मालमत्ता तपासात निष्पन्न झाली आहे.
राऊत यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून बेहिशेबी मालमत्ता मिळविली असल्याचे तपासात उघड झाले आहे. बेहिशेबी मालमत्तेबाबत अधिक चौकशी करण्यासाठी १९ जुलैपर्यंत त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राऊत यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यात असून तेथील पत्ता वास्तव्याबाबत तसेच जवळच्या नातेवाईकांबाबत आतापर्यंत काहीही माहिती दिलेली नाही.
त्यांच्याकडून मूळ पत्ता मिळवून तेथील घराची झडती घेणे बाकी आहे. तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडेदेखील मालमत्तेबाबत अद्याप विचारपूस करण्यात आलेली नाही. त्यांच्या उस्मानाबादेतील घराची झडतीदेखील अद्याप घेतलेली नाही. तपासाअंती या बेहिशेबी मालमत्तेची आकडेवारी मोठी वाढ होण्याची शक्यता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
