बार्शी :- येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी बार्शी व रोटरी क्लब बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि़ 11 जुलै रोजी बार्शीत गौरव गुणवंताचा उपक्रमाअंतर्गत केंद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती रेडक्रॉसचे उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी डॉ़ प्रविण गेडाम यांच्या हस्ते व जिल्हा पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे़ यामध्ये सोलापूर व पुणे जिल्ह्यातील युपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या 18 तर एमएपीएसएसी मधील 7 विद्यार्थ्यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह ,शाल व फेटा देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित केल्याचे कंकुलोळ यांनी सांगीतले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष गौतम कांकरिया यांनी केले आहे.