पांगरी (गणेश गोडसे) :- तेरखेडा (ता. वाशी, जि. उस्‍मानाबाद) येथील फटाक्याच्या शिवकाशीत मंगळवारी घडलेल्या भीषण स्फोटाच्या घटनेमुळे अवघ्या मराठवाडयासह पश्‍चिम महाराष्ट्र हादरला. नऊ कामगारांना आपल्या जिवाला मुकावे लागले. येथील फटाके कारखान्याच्या संदर्भात अनेक प्रश्‍न निर्माण होऊ लागले आहेत. वाशी येथील फटाके कारखान्यात मजुरी करणा-या महादेव ज्ञानोबा सरवदे या जखमी कामगाराचा बुधवारी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यु झाला.
    तेरखेडा येथील दुर्घटनेत बळी गेलेल्यांचा मृत्यु विज पडुन की बंद खोलीत रसायनांच्या स्फोटामुळे झाला? याबाबत तर्क वितर्क लढवले जाऊ लागले असुन कांही ग्रामस्थांनी तर मृत्युच्या तांडवाची ही घटना विज पडुन झाली नसल्याचा आरोप केला असुन यामुळे तेरखेडा प्रकरणाला वेगळाच रंग येऊ लागला आहे. घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत वेगवेगळे मतप्रवाह दिसुन येत असताना प्रशासनही याबाबत कांही ठोस बोलण्‍यास तयार नसल्यामुळे संशयाची पाल चुकचुकली जात आहे.
    मंगळवारी सायंकाळी तेरखेडा येथील फटाके निर्मितीच्या कारखान्यात घडलेल्या भिषण स्फोटाच्या घटनेत एका लहान मुलीसह आठजणांना मृत्युने कवठाळले होते. त्यात बुधवारी एकने भर पडुन मृत्युमुखी पडणा-यांची संख्या नऊवर पोहचली आहे. दुर्घटना घडलेल्या कारखान्यावरून मोठया भाराची विज वाहिनी गेलेली असल्यामुळे संबंधीत कारखान्याला महसुल व पर्यावरण प्रशासनाने परवाना दिलाच कसा? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कायदेशीर कारवाई टाळण्‍यासाठी तर कारखानदार वीज पडुन स्फोट झाल्याचा बनाव निर्माण करत नाहीत ना? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तज्ञांच्या समितीने घटनास्थळास भेट देऊन पाहणी करून योग्य गुन्हे दाखल करण्‍याची ग्रामस्थांची मागणी आहे. भविष्यात नुतन फटाकापरवाने देताना तरी प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी करून त्याआधारेच परवाना देण्‍याची प्रकिया राबवावी. जेणेकरुन भविष्यात अशा प्रकारच्या स्फोटाच्या घटनांना सामोरे जावुन मजुरांना आपल्या प्राणाला मुकावे लागणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. परवान्यातुन मिळणा-या अल्पशा मोहापायी भविष्यात अनेकांच्या मृत्युस आपण कारणीभुत ठरणार नाहीत ना? याची खबरदारी घ्यावी असे बोलले जात आहे. फटाके कारखाने अनेक मजुरांच्या जिवावर उठले आहेत.
मृत्यु इथे स्वस्त आहे
    तेरखेडा येथील कारखान्यात घडलेल्या भयावह घटनेमुळे अनेक गोष्‍टी समोर येऊ लागल्या आहेत. तेरखेडयात मरण स्वस्त असल्याचा प्रत्यय येत आहे. नाममात्र १५० रूपयांवर तेरखेडा येथील मजुर आपला जिव मुठीत धरून रोजंदारीचे काम करतात. मजुरीची समस्या असल्यामुळे निव्वळ दिडशे रूपयांवरही आपला जिव टांगणीला घालुन येथे स्त्रियांसह मजुरांना ज्वलशिल स्फोटकांच्या आगारात काम करावे लागते. घर-संसार, मुले-बाळे, शिक्षण यासह कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्‍यासाठी फटाके कारखान्यात काम करावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया येथील कामगार व्यक्त करत आहेत.
मृत कामगारांच्या कुटुंबाचे पुर्नवसनाचे काय?
    दुदैर्वी घटनेमुळे नऊ निष्पाप कामगारांना प्राणाला मुकावे लागले असले तरी त्यांच्या कुटूंबाच्या पुर्णवसनाचे काय? मृत कामगरांचा सर्वसाधारण विमा काढण्‍यात आला होता का? मृतांच्या कुटुंबाच्या पुर्णवसनासाठी कारखानदार की सरकार पुढाकार घेणार? आघाताने घायाळ झालेल्या कुटुंबांना आधार मिळणार का? आदी प्रश्‍न निर्माण होत आहेत.
    स्फोटकांशी खेळणा-या तेरखेडा गावात पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या दुदैर्वी घटनांना दुजोरा मिळु नये यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानाधारक कारखानदारांची पथकामार्फत चौकशी करून विनापरवाना फटाके कारखान्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी स्थानिक जनतेसह सुज्ञ नागरीकांची व मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांची मागणी आहे.
    प्रथमदर्शनी लोकांच्या सांगण्‍यावरुन नोंद घेलेली असुन शेजारील लोकांकडे व मयतांच्या नातेवाइकांकडे याबाबत चौकशी करून याबाबत उचित कार्यवाही केली जाईल. संशोधकांची मदत घेऊन घटनास्थळावरील परिस्थतीवरूण निर्णय घेतला जाईल, असे सांगुन याबाबत आत्ताच कांही खात्रीशिर सांगता येणार नसल्याचेही येरमाळयाचे स.पो.नि. एम.एन.शेळके यांनी बोलताना सांगितले.
 
Top