बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: परंपरेनुसार आषाढी एकादशीनिमित्त श्री भगवंत उत्सव मुर्तीची रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत शहरातील प्रमुख मार्गावरुन रथयात्रा जात असतांना हजारो भक्तांनी दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी खारीक, खोबरे, विविध प्रकारची फुले इत्यादींची उधळण केली.
      एकादशीच्या पवित्र दिवसानिमित्त दर्शन घेण्यासाठी भगवंत मंदिरात अनेक भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे ३ वाजता काकड आरतीचा नित्योपचार झाल्यानंतर अभिषेक करण्यात आले. सकाळी गरुडावर आरुढ झालेल्या श्री भगवंताच्या उत्सव मुर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बडवे मंडळी परंपरागत पोशाख परिधान करुन उपस्थित होते. रथयात्रा महाद्वार चौक, पटेल चौक, तुळशीराम रोड, दाणे गल्ली, पान खुट, किराणा रोड, गुळओळ रस्ता, पांडे चौक श्रीराम मंदिर येथे आल्यानंतर रथयात्रेचा समारोप करण्यात आला.
    बार्शी जवळील तसेच मराठवाड्यातील अनेक गावातील भगवंत भक्तांनी बार्शीत श्री भगवंताचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दि केली होती. सुव्यवस्थेसाठी बार्शी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
 
Top