बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : विद्युत पुरवठ्यातील अनियमितता व कमी दाबात वीज पुरवठ्यामुळे बार्शी, माढा व कुर्डूवाडी येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने बार्शीतील नगरसेवकांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी नगरसेवकांनी अभियंता एस.आर.यादव यांना कामातील हलगर्जीपणा व जबाबदारी झटकल्याबद्दल जाब विचारला.
    महावीतरणच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या कामचुकारपणामुळे बार्शी शहरातील दिड ते दोन लाख लोकांचा पाणीपुरवठा मागील दोन महिन्यांपासून खंडीत होत आहे. बार्शी पाणी पुरवठ्यासाठी कंदर हेडवर्क्स येथे जेऊर व टेंभूर्णी या दोन्ही ठिकाणाहून विद्युत पुरवठा घेता येतो परंतु दि.१ जून पासून शटडाऊन घेतांना एकाच वेळी दोन्ही ठिकाणचे शटडाऊन केले जाते त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. कंदर पंपहाऊस विद्युत पुरवठा होतांना व्होल्टेज अचानक कमी होते त्यामुळे पंक दिवसात दहा वेळा ट्रिप होतात त्यामुळे गळतीचे प्रमाण वाढत आहेत. कुर्डूवाडी येथे बार्शी पंपगृहास होणार्‍या विद्युत पुरवठ्यावर सकाळी ७ ते ९.३० व दुपारी ३ ते ५ हे करण्यात येणारे लोडशेडींग कायमस्वरुपी रद्द करण्यात यावे. या बाबींची पुर्तता न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे.
    यावेळी नगरसेवक नागेश अक्कलकोटे, उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, रिझवाना शेख, कादर तांबोळी, देविदास शेटे, अंबादास शेटे, अरुणा परांजपे, लता गवळी, बाबुराव जाधव, मनिष चौहाण, अमोल गुडे, दगडूनाना मांगडे, संदीप बारंगुळे आदी उपस्थित होते.
 
Top