उस्मानाबाद :- राज्य शासनाच्या कृषी व संलग्न योजनांच्या विविध योजनांची अंमलबजावणी एकत्रितरित्या केली तर त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतक-यांना होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी शेतकरी गटाच्या माध्यमातून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन विकास साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले.
    येथील पुष्पक मंगल कार्यालयात कृषी व संलग्न विभाग योजना अभिसरण (स्कीम कन्वर्जन्स) कार्यशाळा  आयोजित करण्यात आली होती. त्याचे उदघाटन डॉ. नारनवरे यांच्या हस्ते झाले. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी अशोक किरनळ्ळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे प्रकल्प संचालक विजय लोखंडे, आत्माचे विभागीय उपसंचालक संतोष आळसे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. टाकणखार,  प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. डी. ए. हाके, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. एस. आर. साबळे, एस. आर. चोले आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी डॉ. नारनवरे म्हणाले की, कृषी व संलग्न विभाग योजना अभिसरण हा राज्यातील नावीन्यपूर्ण उपक्रम असून तो आपल्या जिल्ह्यात राबविला जात आहे, ही आनंदाची बाब आहे. जिल्ह्यातील शंभर टक्के शेती ही शेतकरी गटामार्फत झाली, तर त्याचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे आत्मा योजनेंतर्गत  जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी गटात सहभागी झाले पाहिजे. कृषी सहायकांनीही शेतकरी गटाचे फायदे शेतक-यांना समजावून सांगून त्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
      शासनाच्या विविध योजना एकत्रितपणे राबविल्या तर त्याचा फायदा संबंधित शेतकरी आणि गावाला होणार आहे. सध्या कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. कृषी यांत्रिकीकरण प्रत्येक शेतकऱ्यांस खर्चाच्या दृष्टीने परवडते असे नाही. त्यामुळे गटाच्या माध्यमातून शेती करणे हे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्याही परवडणारे असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विस्ताराच्या कार्यक्रमात हे गट अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचेही डॉ. नारनवरे यांनी स्पष्ट केले.
      कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तोटावार यांनी कार्यशाळा आयोजनामागील भूमिका समजावून सांगितली. आजच्या कार्यक्रमात शेतीमित्रांनाही बोलावण्यात आले होते. त्याचबरोबर उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांची यावेळी उपस्थिती होती. विविध जिल्हास्तरीय कृषी संलग्न विभागांचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.    
 
Top