उस्मानाबाद -:  कृषी व संलग्न विभागांच्या विविध योजनांचा एकत्रित लाभ शेतक-यांना मिळाला पाहिजे, त्यासाठी कृषी मित्र  आणि कृषी सहायकांनी या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे आणि शेतक-यांना त्याचे महत्व पटवून देणे आवश्यक असल्याचा सूर उस्मानाबाद येथील आयोजित कार्यशाळेत उमटला.
       कृषी व पणन विभागाच्या वतीने पुष्पक मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी  विविध विभागांच्या प्रमुखांनी त्यांच्या यंत्रणेचे कार्य व योजनांची माहिती उपस्थितांसमोर मांडली. कृषी विस्तार कार्यक्रम म्हणजे दुसरे काही नसून या योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे आहे. त्यादृष्टीने सकारात्मक पद्धतीने प्रयत्न करण्याचे आवाहनही या कार्यशाळेत करण्यात आले.
     कषी योजनांसह आत्मा, दुग्धविकास, कृषी यांत्रिकीकरण, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
     आत्माचे विभागीय उपसंचालक संतोष आळसे म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश असून या देशात शेती विकास पध्दती विकसित करण्याचे कार्य शेतकऱ्यांकडून होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी पुरुष व महिला गटाची स्थापना करुन शेतविषयक अडचणी मांडण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यांचे संयुक्त अभ्यास दौरे सोबत झाले तरच त्यांच्यामध्ये शेती विषयक केंद्राच्या अंमलबजावणीसाठी  एकोपा निर्माण करणे अभिप्रेत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन योजना सर्व गटासाठी लागू करण्यासाठी शेतकरी गट, विस्तारित गट, समुह गट, गट शेतीचे साधनाच्या आधारे नियोजन करणे महत्वाचे आहे. आदर्श शेती करण्यासाठी कृषि मित्राचे मनुष्यबळाचा वापर करावा. त्यांचा वापर करुन घेतल्यास आदेश शेती करता येते,असे मत यांनी कृषि व संलग्न विभाग योजना अभिसरण जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सांगितले.
    विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी अशोक किरनळ्ळी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने पिक विमा, शेतकरी जनता अपघात विमा, खरीप हंगाम धोरण या संकल्पनेवर आधारित विकास योजना, तसेच कमी पाण्यावर जास्त उत्पादन घेण्यासाठी उत्पादक व ग्राहक धोरण, शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे, प्रकल्पावर आधारित कृषिविषयक गटामार्फत शेतकरी गटाचे बळकटीकरण करणे, गळीत व कडधान्य विकसीत करण्यासाठी काम करणे महत्वाचे आहे. कोरडवाहू शेती अभियानात गावांची निवड करुन प्रकल्पातंर्गत कामे करणे, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ( नगदी पिके), राष्ट्रीय गळीत धान्य  तेलताडा अभियान, कोरडवाहू शेती अभियान आणि राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत वैरण विकास कार्यक्रम योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे,असे आवाहन श्री किरनळ्ळी यांनी केले.
    प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. डी. ए. हाके  यांनी रेशीम उद्योगाविषयी विवेचन केले. रेशिम उद्योग पूर्वी महाराष्ट्राच्या सीमालगतच्या भागात चालत असे, पण मागील काही वर्षापासून हा उद्योग प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या कोष व तुतीची लागवड यासाठी अत्यंत कमी पाणी लागते. कमी वेळेत चांगले उत्पादन घेता येते. या योजनेसाठी शासनाकडून अनुदानही उपलब्ध करुन दिले जाते. या व्यवसायात महिलांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगितले. याशिवाय, शासनाने रेशिम उद्योगात कच्चा माल ते बाजारपेठ पर्यंतच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे या उद्योगावाढीसाठी शेतकरी  व महिलांनी पुढे यावे, असे आवाहन केले.
    तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. टाकणखार यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करतांना जमिनीचे आरोग्याची काळजी तेवढीच महत्वाची आहे. शेती करतांना जमिनीतील कस व पोत कमी होऊ नये यासाठी शेणखत, गांडूळखत, सेंद्रीय खताचा वापर शेतीत वाढविल्यास शेती पिकाचे उत्पादन  वाढते. तसेच चुनखडीयुक्त जमिनीचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन करतांना त्यातील घटकांचे परिक्षण करणे गरजेचे आहे. समतोल अन्नद्रव्यासाठी कार्बन, हायड्रोजन व ऍ़क्सीजनची महत्व आहे. शेतीतील खताचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रति एकरी 8 किलो गंधकाचा वापर करावा,असेही त्यांनी सांगितले.  यावेळी डॉ. राज पाटील यांचे कृषी यांत्रिकीकरण विषयावर मार्गदर्शन झाले.  
 
Top