बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉं.तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली महागाईविरोधात व विविध मागण्यांसाठी बार्शी तहसिलवर मोर्चा काढण्यात आला. बुधवारी दुपारी भगवंत मैदान येथून शहरातील प्रमुख मार्गावरुन बार्शी तहसिल कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी भा.क.प.च्या वतीने वाढती महागाई कमी करा, साखर, पेट्रोल, डिसेलचे दर कमी करा, रेल्वे प्रवास, माल वाहतूकीची वाढ रद्द करा, भाजीपाल्यांचे दर आटोक्यात आणा, पिण्याच्या पाण्याचे समान वाटप करा व पाणीपुरवठ्यावेळी खाजगी डायरेक्ट जोडलेले विद्युत पंप बंद करा, दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चार्याची व्यवस्था करा, दुष्काळामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा, डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या खून्याचा शोध घ्या. दलितांवरील अत्याचार रोखा, अहमदनगर येथील मृत नितीन आगेच्या खून्यास शिक्षा द्या, मृत मोहसिन शेखच्या खून्यास कडक शासन करा, कंत्राटीकरण रद्द करा आदी मागण्यांचे लेखी निदेदन तहसिलदार बालाजी सोमवंशी यांना देण्यात आले आहे.