बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील व शहराध्यक्ष शिवानंद हिप्परगे यांनी दिली.
        वीरशैव लिंगायत समाजातील लिंगायत वाणी व लिंगायत जातींसह उपजातींना ओबीसी आरक्षण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जाहीर करावे, मंगळवेढा (जि.सोलापूर) येथे महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक त्वरीत उभे करावे, सोलापूर विद्यापीठास महात्मा बसवेश्वर विद्यापीठ अथवा श्री सिध्देश्वर विद्यापीठ असे नाव द्यावे या तीन प्रमुख मागण्यांसाठी या धडक मोर्चाचे आयेाजन करण्यात आले आहे.
    या मोर्चामध्ये आमदार शिवशरणआण्णा पाटील बिराजदार, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सिद्रामअप्पा पाटील, मा.आ.सिध्दराम म्हेत्रे, अॅड्.प्रशांत शेटे यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
    मागील १८ वर्षांपसून शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजातील लिंगायत वाणी व लिंगायत जातींसह इतर उपजातींना ओबीसी आरक्षण मिळविण्यासाठी अनेक वेळा विधानभवनावर धडक मोर्चे, रास्ता रोको आंदोलने, धरणे आंदोलन इत्यादी करुन लिंगायत ओबीसी आरक्षण हक्क परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या व्यासपीठावर आर.पी.आय.चे अध्यक्ष खा.रामदास आठवले, रा.स.प.चे.अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांच्यासह शिवसेना व भाजपाचे अनेक आमदार व खासदार यांनी उपस्थित राहून लिंगायत समाजाच्या ओबीसी आरक्षण मागणीला जाहीर पाठींबा दिला आहे. यापूर्वीही शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या आंदोलनामुळेच लिंगायत तेली, लिंगायत माळी, वाणी या जातींचा ओबीसी मध्ये समावेश तसेच लिंगायत वाणी व लिंगायत जातींसह उपजातींचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी शिवा संघटनेने अनेक वेळा आंदोलने केल्यानंतर २०१० मध्ये राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांनी राज्याच्या २२ जिल्ह्यांत लिंगायतांना ओबीसी आरक्षण देण्यासाठी सर्वे पूर्ण केला आहे. परंतु राज्य शासनाच्या उदासिनतेमुळे ओबीसी आरक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण देण्याऐवजी लिंगायतांना अल्पसंख्यांक देर्जा देण्यासाठी शासनाला शिफारस करण्याची फसवी घोषणा करुन समाजाच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. समाजामध्ये दुही निर्माण करुन पूर्वनियोजन फसव्या स्वरुपाचे आंदोलन करुन आझाद मैदानावर धरणे धरण्याचा खटाटोप व षडयंत्र करण्यात आले असल्याने लिंगायत समाजामध्ये चिड निर्माण झाली आहे. लिंगायत समाजाला अल्पसंख्यांक दर्जा देण्याचे शरद पवार यांच्या अखत्यारीतील गोष्टच नसतांना व घटनेतील ६ धर्म मान्यताप्राप्त झाल्यानंतर इतर अनेक धर्मांसाठी वेगळ्या रकान्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकित निर्णय यापूर्वीच झालेला आहे व ही गोष्ट माहिती असूनही येड्याचे सोंग घेऊन जे कधीच मिळणार नाही व त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे ते मिळवून देण्याचे गाजर दाखवून शरद पवार यांनी समाजाची फसवणूक सुरु केली आहे.
    महाराष्ट्र राज्यातील ८५ लाख वीरशैव लिंगायत समाजाची मते असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत समाजाची फसवणूक करणारांना धडा शिकवतील. समाजाला जागृत करण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
 
Top