बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: सततच्या होणार्‍या नवरा बायकोच्या भांडणाला कंटाळून तरुण विवाहिता माहेरी आईवडिलांकडे राहत होती. पत्नीवर संशय घेऊन पतीने तिला भर चौकात अडवून कोयत्याने हल्ला केला व गंभीर जखमी केले, यानंतर स्वत:च्याही हातावर मारुन पळून गेल्याची घटना बार्शीतील बाळेश्वर नाका चौक येथे घडली आहे.
      श्‍वेता गणेश घोरपडे (वय १८, सध्या रा. बागवान प्लॉट, कासारवाडी रोड, बार्शी) असे जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. यातील हल्ला करणारा गणेश तानाजी घोरपडे (रा.बारंगुळे प्लॉट,बार्शी, सध्या रा.सांगवी पुणे) असे तिच्या पतीचे नाव आहे. याबाबत मुलीची आई कमल संतोष कदम (वय ३३) हिने गणेश याच्या विरोधात बार्शी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
    २० नोव्हेंबर २०१३ रोजी श्‍वेता व गणेश यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोघांमध्ये सतत भांडणे होत असल्याने श्‍वेता तिच्या माहेरी आई वडिलांकडे राहण्यास परत आली. गणेश हा तिला वारंवार फोनवर धमक्या देत होता व चारित्र्यावर संशय घेत होता याबाबत त्यांच्यामधेय तक्रारी होत्या. दरम्यान मुलीला नांदण्यास पाठवा नाहीतर अद्दल घडवीन अशा धमक्याकी तो फोनवर देत होता.
       श्‍वेता ही येथील शिवाजी महाविद्यालयात १२ वी चे शिक्षण घेत आहे व ती शिकवणी व शिक्षणासाठी पहाटेच घराबाहेर पडते अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाल्यानंतर गणेश याने तिच्या पत्नीवर पाळत ठेवली व तिची मैत्रिण स्वप्नाली दराडे हिच्यासोबत शिक्षणासाठी जात असल्याचा त्याला सुगावा लागला. सकाळी पावणेसहाच्या दरम्यान गणेश याने श्‍व्ेता हिस बाळेश्वर नाक्याजवळील चौकात अडवून कमरेला लावलेला कोयता हातात घेऊन तिच्या डोक्यात, छातीवर व हाताला गंभीर जखमा केल्याने श्‍वेता चक्कर येऊन खाली पडली. यानंतर गणेशने स्वत:च्या हातावर मारुन घेऊन तेथून पळ काढला. रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍या नागरिकांनी तिला जखमी अवस्थेत तिच्या घरी व नंतर जगदाळे मामा रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत बार्शी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून सदरच्या घटनेचा पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक अभिषेक डाके हे करीत आहेत.
 
Top