पंढरपूर :– निर्मलग्राम मध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून संपूर्ण महाराष्ट्र निर्मल करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
       पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी  राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री आ. लक्ष्मणराव ढोबळे, आ. भारत भालके, आ. दीपक साळूंखे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, नगराध्यक्षा उज्वलाताई भालेराव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम,जि.प. चे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी. झेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
      यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निर्मलग्राम मध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे आता नुसते निर्मलग्रामवर न थांबता निर्मल तालुके व जिल्हे पहिल्यांदा महाराष्ट्रात होणार आहेत. कोल्हापूर जिल्हा हा देशातला पहिला निर्मल जिल्हा म्हणुन महाराष्ट्राला बहुमान मिळणार आहे. त्यानंतर हळुहळु संपूर्ण महाराष्ट्र निर्मल होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
     निर्मल ग्राम मध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकणात चांगली प्रगती आहे परंतू अन्य ज्या भागात चांगली परिस्थिती नाही तेथे अधिक लक्ष दिले पाहिजे. स्वच्छतेअभावी सर्वात जास्त आजार निर्माण होतात. त्यामुळे याबाबत कल्पकतेने प्रचार व प्रसार करुन प्रभावी जनजागृती केली पाहिजे. महाराष्ट्रात अनेक लोककलेचे प्रकार जीवंत आहेत. या लोककलेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. यामूळे लोकांची करमणुक करुन स्वच्छतेचा व ग्रामसभेचे महत्व याबाबतचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. पाणीपुरवठा व ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रभावी जनजागृतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याला यश येत असल्याचे मुख्यमंत्र्यांची याप्रसंगी सांगितले.  
         यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील म्हणाले की, शासनाचे उपक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या  दिंडीतील कलाकारांनी केलेले आहे. लोककला ही अतिशय प्रभावी माध्यम आहे. स्वच्छता अभियान व निर्मल अभियान यामध्ये राज्याचे देशात योगदान महत्वाचे आहे. त्यामूळे पंचायत राज्य व्यवस्थेचे ग्रामविकास विभागाचे केंद्र शासनाचे 3 कोटी रुपयाचा पुरस्कार राज्याला मिळाला असल्याचे सांगितले.  तर पालकमंत्री दिलीप सोपल यांनी लोककलावंताच्या माध्यमातून या सोहळयातील भाविकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न लोककलावंत करतात. शासन वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान देते. त्यामूळे स्वच्छतेचा कार्यक्रम लोकात रुजु लागला आहे. घर तेथे शौचालय हा कार्यक्रम शासनाचा न राहता तो लोक चळवळीतुन उभारला पाहिजे. संपूर्ण देशात महाराष्ट्राचा स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचा क्रमांक पहिला असून जलस्वराज्य टप्पा - 2 साठी संपूर्ण देशात महाराष्ट्राची निवड जागतिक बॅकेने  याचा निकषावर केली असल्याचे श्री. सोपल यांनी सांगितले.
     याप्रसंगी  पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विविध् प्रकाशनाचे, सीडीचे विमोचन मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या दिंडीतील विविध सहभागी कलावंताचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
    याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गुळवे, पंचायत समिती सभापती श्रीमती पुष्पा जाधव, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव किरण गीते, तहसीलदार गजानन गुरव, गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
Top