नळदुर्ग :- येथील नगरपालिकेच्‍या नगराध्‍यक्षपदी कॉंग्रेसच्‍या सौ. मंगल सुरवसे यांची बिनविरोध निवड झाल्‍याचे सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी यांनी जाहिर केले. नगराध्‍यक्षपदी सुरवसे यांची निवड जाहीर होताच शहरात कॉंग्रेस कार्यकर्त्‍यांनी मुक्‍तपणे गुलाल उधळून फटाक्‍याची जोरदार आतिषबाजी केली.
    नळदुर्ग येथील नगराध्‍यक्षपद हे ओबीसी (इतर मागासवर्गीय) स्‍त्रीसाठी राखीव होते. नगराध्‍यक्षपदासाठी कॉंग्रेसच्‍या नगरसेविका मंगल सुरवसे व राष्‍ट्रवादीच्‍या सुफीया कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज माघार घेण्‍याच्‍या शेवटच्‍या दिवशी सुफीया कुरेशी यांनी आपला उमदेवारी अर्ज माघारी घेतल्‍याने नगराध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीसाठी एकमेव सुरवसे यांचे अर्ज राहिल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड झाली. गुरुवार दि. 17 जुलै रोजी निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर यांनी बिनविरोध निवड झाल्‍याचे जाहीर केले. यावेळी निवडणूक सहाय्यक म्‍हणून नायब तहसिलदार भोसीकर यांनी काम पाहिले. यावेळी कार्यालयीन अधिक्षक डी.एन. कस्‍तुरे हे उपस्थित होते.
नूतन नगराध्‍यक्ष मंगल सुरवसे यांचे उपनगराध्‍यक्षा अपर्णा बेडगे, संतसेना नाभिक संघटनेचे सुभाष महाबोले, रामकृष्‍ण महाबोले, राजू महाबोले, बाळासाहेब महाबोले, कॉंग्रेसचे गटनेते तथा माजी नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सय्यद सावकार, शहबाज काझी, राष्‍ट्रवादीचे गटनेते नय्यर जहागिरदार, जिलानी कुरेशी, शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष पुदाले, ज्ञानेश्‍वर घोडके, युवक कॉंग्रेसचे शहराध्‍यक्ष बसवराज धरणे, शहराध्‍यक्ष नवाज काझी, कॉंग्रेस शिक्षक सेलचे जिल्‍हाध्‍यक्ष संजय दळवी, श्री तुळजाभवानी साखर कारखान्‍याचे माजी संचालक अख्‍तर काझी यांच्‍यासह अनेकांनी अभिनंदन करुन सत्‍कार केले.

फोटो ओळ : नूतन नगराध्‍यक्ष सौ. मंगल उध्‍दव सुरवसे यांचा सत्‍कार करताना निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हा पुनवर्सन अधिकारी अरविंद लाटकर, शेजारी उपगनराध्‍यक्षा अपर्णा बेडगे.
 
Top