नळदुर्ग :- कॉंग्रेसचे कार्यकर्ते तथा प्रगतशील शेतकरी सत्‍यवान सुरवसे यांनी आपल्‍या शेकडो कार्यकर्त्‍यांसह प्रदेशाध्‍यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्‍या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे भाजपामध्‍ये जाहीर प्रवेश केले.
    मुर्टा (ता. तुळजापूर) येथील सत्‍यवान सुरवसे यांच्‍या भाजपा प्रवेशाने ऐन विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर कॉंग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे. सत्‍यवान सुरवसे हे एक प्रगतशील शेतकरी आहेत. त्‍याचबरोबर त्‍यांनी कल्‍पतरु सेवाभावी सामाजिक संस्‍थेच्‍या माध्‍यमातून तालुक्‍यात अनेक सामाजिक कार्य केले आहेत. तसेच मुर्टा ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी गेल्‍या एक-दोन वर्षात गावचा जो विकास केला आहे. त्‍याचे सर्वांनीच कौतुक केले आहे. सत्‍यवान सुरवसे यांना शेतक-यांमध्‍ये मानाचे स्‍थान आहे. आपली शेती सुधारण्‍याबरोबरच त्‍यांनी तालुक्‍यासह उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील शेतक-यांना आधुनिक शेती करण्‍याचे तंत्रज्ञान समजावून सांगून त्‍यांनाही आधुनिक शेती करायला लावून शेतक-यांच्‍या जीवनात एक क्रांती घडवून आणली आहे. तसेच तालुक्‍यातील शेतक-यांना शासनाच्‍या विविध योजनांची माहिती करुन देण्‍यासाठी शेतक-यांना अभ्‍यास दौ-यावर घेऊन जाण्‍याचे कामही सुरवसे यांनी केले आहे. 
     मुंबई येथील भाजपाच्‍या प्रदेश कार्यालयात मुर्टा ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते सत्‍यवान सुरवसे यांनी शेकडो कार्यकर्त्‍यांसह भाजपामध्‍ये जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष आ. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते ना. विनोद तावडे, ना. एकनाथ खडसे, खा. किरीट सोमय्या, आ. पंकजा पालवे-मुंडे, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे, जिल्‍हा सरचिटणीस भिमाशंकर हासुरे, तालुकाध्‍यक्ष विजय शिंगाडे, पं.स. सदस्‍य साहेबराव घुगे, संजय निंबाळकर, मिलिंद पाटील, नळदुर्गचे माजी नगरसेवक दिलीप कुलकर्णी, दत्‍ता राजमाने, सुशांत भूमकर, अनिल काळे, अक्‍कलकोटचे आमदार सिद्रामाप्‍पा पाटील, आमदार विजय देशमुख आदीजण उपस्थित होते.
 
Top