उस्मानाबाद :- जनतेच्या सर्वांगीण विकासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात. त्या योजनेतून जनतेच्या हिताच्या योजनेचा लाभ किती नागरिकांनी घेतला, याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जनतेशी संवाद साधुन घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, ग्रामीण भागातील अपुर्ण कामे तातडीने पुर्ण करुन जनतेच्या विकास कामांना प्राधान्य द्यावेत,असे निर्देश संबंधित यंत्रणेला त्यांनी दिले.
      यावेळी प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे कृषि सभापती पंडित जोकार, तुळजापूर पं. स. उपसभापती  प्रकाश चव्हाण, प.स.सदस्य डोलारे, बाबा वडणे, तहसीलदार पाटील, सहायक गट विकास अधिकारी चकोर, तालुका  कृषि अधिकारी जाधव आदि उपस्थित होते.
        गंजेवाडी येथील नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रशासनाने 70 लाख रुपये देण्यात आले असल्याची  माहिती पालकमंत्री चव्हाण यांनी दिली. वडगाव काटी येथे नवीन बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाचे उदघाटन व दलित वस्ती सुधार योजनेतून बांधण्यात येणा-या समाज मंदिराचे भूमीपूजन, केमवाडी येथे आमदार निधीतून 5 लाख 30 हजार रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे उदघाटन  पालकमंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. गंजेवाडी, वडगाव, जळकोटवाडी, केमवाडी आदि गावास भेटी देवून तेथील नागरिकांच्या समस्या जाणुन घेऊन वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांच्या विविध अडचणीचे निराकरण करावे. संबंधित गावातील पाणीपुरवठा योजना, इंदिरा आवास योजना, विहीरींची कामे, राजीव गांधी जीवनदायी योजना अशा अनेक लोक कल्याणकारी योजना गावात राबविण्यात आल्या असून या योजनेचा लाभ जनतेस झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.  
       जळकोटवाडी येथील द्राक्ष शेतक-यांचे द्राक्ष परराज्यात पाठविली जातात. वाहतूक करताना रस्ता खराब असल्याने द्राक्षाचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी तेथील शेतक-यांनी केली. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, अशा वेगवेगळया अडचणी सोडविल्या जातील. तसेच जादा वीजेचे देयके दुरुस्ती करण्याचा कॅम्पचे आयोजन करण्याचे संबधित अधिका-यांना निर्देश दिले. याप्रसंगी विविध खात्याचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.        
 
Top