उस्मानाबाद -: जिल्ह्यातील गावक-यांच्या मदतीने वृक्ष लागवडीचा एकच पॅटर्न न ठेवता गायरान जमीन, रस्ते व शेतीच्या बांधावर लिंबोळी, सिताफळ, आंबा,जांभळ, करंज, चिंच या फळझाडांची लागवड केल्यास पक्षाचे संवर्धन होऊन त्यांच्या संख्येत वाढ होईल, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी केले.
         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  सभागृहात शतकोटी वृक्ष लागवड व रोजगार हमी योजनेच्या बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीरंग तांबे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे प्रकल्प संचालक व्ही.डी. लोखंडे, उप विभागीय अधिकारी यु.बी. बिराजदार, तालुका कृषी अधिकारी डी.आर.जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
        श्री.पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद, वन, सामाजिक वनीकरण, कृषि या विभागांना देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उदिष्ट वेळेवर पूर्ण करावे. शेतीच्या बांधावर, गायरानावर मोठया प्रमाणात वृक्ष झाडे लावण्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत. प्रत्येक तालुक्यात युवक-युवतीचे मेळावे घेऊन त्यांना वृक्ष लागवडीसाठी सहभागी करुन घ्यावे. रोहयोमार्फत रोपे लावणे ही कामे केली जाणार असल्याने या कामांना प्राधान्य द्यावे,असेही त्यांनी सांगितले.
       जुनी रोजगार हमी योजनेच्या पाझर तलावाची कामे पूर्ण करण्यासाठी 31 जुलैपर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. सुधारित शासकीय मान्यते अभावी काही कामे प्रलंबित असल्यास त्याचेही प्रस्ताव विनाविलंब सादर करावे.  पूर्ण झालेल्या तलावातील गाळ काढणे, पायाभरणीची दुरुस्ती करणे, वाहून जाणारे पाणी अडविणे, त्याची साठवणूक करणे, उर्वरित गाळ शेतक-यांना देण्यासाठी मदत करणे बंधाऱ्यातून किती पाणी साठवणूक झाली व किती वाहून गेले याचा अहवाल शासनास सादर करावयाचा असल्याने ही कामे वेळेत तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश श्री.पाटील यांनी संबंधित यंत्रणेनेला दिले.
 
Top