तुळजापूर :- शेतक-यांच्या हितासाठी शासन नेहमी तत्पर असून नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतक-यांना शासनाने मदतीचा हात देवून त्यांना संकटातून बाहेर काढले आहे, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील विविध गावांच्या भेटीप्रसंगी केले. तुळजापूर तालुक्यातील केरुऱ, बाभळगाव व शिरगापूर आदी गावांना भेटी देवून तेथील जनतेच्या विकासाठी शासनाने राबविलेल्या विविध योजनेची माहिती घेवून  तेथील जनतेशी त्यांनी संवाद साधून उर्वरीत योजनेच्या कामांना गती देण्याचे आदेश संबधित यंत्रणेला याप्रसंगी दिले.
     यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे कृषि सभापती पंडित जोकार, तुळजापूर पं. स. उपसभापती प्रकाश चव्हाण, सहा. गटविकास अधिकारी चकोर, नायब तहसीलदार वाघे, वीज मंडळाचे सहायक अभियंता कमल मोर आदि अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
     बाभळगाव येथे बोलताना पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, सध्या शेतक-यासमोर अनेक समस्या उभे असून वेळेवर पाऊस न पडल्याने पेरण्या रखडल्या. जे शेतकरी अगोदर पेरण्या केल्या त्यांच्या पीकास पाणी न मिळाल्याने पीके कोमेजून जात आहे. पाऊस न पडल्याने  पिण्याचे पाण्याचे प्रमाण कमी झाले. जनतेस व जनावरास पाणी कमी पडु नये, म्हणून पाणी उपसा करण्यास बंधने घालण्यात  आली आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी या लहरी पाऊसाचा अंदाज घेवून कृषी पीकाचे नियेाजन करावेत व  कमी पावसात येणाऱ्या  पीकाची लागवड करावी,असे आवाहन त्यांनी केले.
       पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी योजनेचा लाभ  घ्यावा. वीजेची थकीत रक्कम  50 टक्के देयक भरुन सहकार्य करावे, असेही ते म्‍हणाले. शिरपूर येथे विकासाची कामे चांगली झाली. कांही कामे आडवा-आडवीमुळे प्रलंबित राहिली. नागरीकांनी गावच्या विकास कामासाठी एकत्र येवून तोडगा काढून प्रलंबित कामे पुर्ण करुन घ्यावीत. शासन जनतेच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. प्रत्येक योजनेचा लाभ जनतेला मिळाला पाहिजे. घरकुल योजना, निराधार योजना आदि योजनेचा लाभ जनतेला चांगल्या प्रकारे होत असल्याने तेथील जनतेनी याप्रसंगी सांगितले.
       राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून एक लाख 50 हजार रुपयापर्यंत खर्च येणा-या आजारावर मोफत उपचार केला जातो. या योजनेचा लाभ राज्यातील 2 लाख रुग्णाला झाला असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. विद्यार्थ्यांना व  जेष्ठ नागरीकांना विविध सवलती, ज्यांना घर नाहीत त्यांना पक्की घरे बांधून दिली . जेष्ठाना पालन पोषणासाठी  दरमहा 600 शासन रुपये देत आहे. शेतकऱ्यांच्या वीज बील दुरुस्तीसाठी वीज मंडळाने कॅम्प लावून त्यांच्या अडी-अडचणी दुर कराव्यात तसेच मुला-मुलींना वेळेवर शाळेत जाता यावे, यासाठी एस. टी. महामंडळाने  बस नियमित सुरु  ठेवावीत. असेही पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
      याप्रसंगी केरुर येथील जमिनीचा कबाला देण्याबाबत संबंधित अधिका-यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. शासनाने राबविलेल्या पाणीपुरवठा योजनेचा फायदा चांगल्या प्रकारे व्हावे व नागरीकांनी पाणीपुरवठा करणा-या विजपंप, स्टाटर यांची नुकसान होणार नाही, याची खबरदारी  सर्वांनी घेण्याची गरज प्रतिपादन केली. यावेळी  सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top