उस्मानाबाद :- जिल्ह्यात शेतक-यांनी पेरणी केलेल्या सोयाबीनची उगवण क्षमता कमी झाल्याने व कांही ठिकाणी सोयाबीनचे पीक उगवले नाही, त्याचे पंचनामे करुन ज्या कंपन्या दोषी आढळून येतील अशा बियाणे पुरवठा करणा-या कंपनीवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश ल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी येथील जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिका-यांच्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हयात सोयाबीन उगवण क्षमतेबाबत 70 गावांच्या 245 तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारीचे निवारण करण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय चौकशी पथक नेमून संबंधित अधिका-यांनी अहवाल प्रशासनास देण्याच्या सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी या बैठकीत संबंधित यंत्रणेला दिल्या.
ज्या ज्या शेतक-यांनी सोयाबीन पेरणी केले आहे, परंतु त्याची उगवण झाली नाही, अशा शेतक-यांना दुबार पेरणीसाठी तात्काळ सोयाबीन बियाणांचा पुरवठा करण्यात यावा, अशाही सूचना त्यांनी यावेळी देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हास्तरीय अधिका-यांकडील होत असलेल्या कामांबाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी निवासीउपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी बी. एस. चाकूरकर, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.देशपांडे, नियोजन विभागाचे भांगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.