बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : कुर्डूवाडी लातूर बाह्यवळण रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिराजवळ झालेल्या विचित्र अपघातात रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडी व चहाच्या टपरीत वाहन घुसल्याने दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
      सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला असून उपळाई ठोंगे या गावाकडून बार्शीकडे येत असलेले मॅग्नम ऑप्ट्रा वाहन क्र.एम. एच. १४-बी.सी. ८५०५ व लातूरकडून कुर्डूवाडीकडे निघालेले इंडिका विस्टा वाहन क्र. एम.एच.१३ - ए.सी. ८५९० या वाहनांची धडक झाली. या विचित्र अपघातातील इंडिका वाहनाचा वेग जास्त असल्याने धडकेनंतर ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडी व हॉटेलमध्ये घुसले. या अपघातात झोपडी व छोट्या कॅन्टीनमध्ये असलेल्या लक्ष्मी आप्पा भोळे (वय ४५), वैष्णवी सागर भोळे (वय ६) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनास्थळी बार्शी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेखा धस यांनी भेट दिली. अपघातानंतर रस्त्याच्या चौकात असलेल्या वाहनाचा पंचनामा करुन वाहन बाजूला घेऊन वाहतुक सुरळीत करण्यात आली. बार्शी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. बाह्यवळण रस्त्यावर बार्शीला जोडणार्‍या जाणार्‍या उपमार्गांतून वाहनांना काही ठिकाणी अंदाज येत नसल्याने तसेच रस्त्याच्या मध्यभागी पथदर्शक व दिशादर्शकाची आवश्यकता आहे. मागील काही दिवसांत छोटे मोठे अपघात झाले आहेत याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
Top