उस्मानाबाद :- न्यायालयीन प्रकरणांची माहिती पक्षकारांच्या आणि सरकारी वकिलांना तात्काळ मिळावी आणि जेणेकरुन दोन्ही बाजूंची मंडळी न्यायालयात वेळेवर उपस्थित राहतील यासाठी आता जिल्हा न्यायालयाने एसएमएस सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांची माहिती आता संबंधित वकीलांना तात्काळ मिळू शकणार आहे. याशिवाय, संबंधित खटल्याच्या प्रत्येक टप्प्यावर एसएमएस सुविधेद्वारे माहिती मिळणार असल्याने प्रत्येक वेळी न्यायालयात जाऊन प्रकरण किती तारखेला सुनावणीसाठी येणार आहे, याचीही माहिती आता मिळू शकणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांच्या हस्ते या सुविधेचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला.
      या सुविधेमुळे न्यायालयीन कामकाजात आता माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याचे दिसत आहे. सध्या जिल्हा न्यायालयात 2006 पासूनची सर्व प्रकरणे संगणकीकृत आहेत. त्याच्या नोंदी संगणकाद्वारे अद्यावत केल्या जातात. आता या एसएमएस सुविधेने त्यात आणखी भर पडली आहे. या एसएमएस सुविधेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा न्यायाधीश (वर्ग-1) पठाण, न्या. मोरे (वरिष्ठ स्तर), जिल्हा सरकारी वकील व्ही. बी. शिंदे, बार असोसिएशनचे पदाधिकारी सर्वश्री एम. एस. घोगरे, ए.टी. कदम, पी. ए. जगदाळे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
       या एसएमएस सुविधेसाठी एनआयसी पुणे यांनी सॉफ्टवेअर विकसित केले असून उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार ते विकसित करण्यात आले आहे. यात वकिलांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यात आली असून त्यांना त्यांच्या प्रकरणांची माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे.  या सुविधेमुळे वकील तसेच पक्षकारांचीही सोय होणार आहे. एसएमएसद्वारे प्रकरणाची सद्यस्थिती कळल्याने  त्यांचा वेळ वाचणार आहे.
        या सुविधेचा लाभ घ्यावा आणि ज्या वकिलांनी त्यांचे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नसेल त्यांनी संगणक विभागात ती करुन घ्यावी, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांनी केले आहे.                    
 
Top