बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- नेर्ले (ता.करमाळा) येथील वस्तीपासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या गणेश बिभिषण जगताप यांच्या घरावर दरोडा पडला. सदरच्या प्रकारात जगताप यांच्या कुटूंबास ६ ते ८ जणांच्या जमावाने शस्त्राने गंभीर दुखापत केली. त्यांच्या घरातील रोख ७० हजार रुपये, ७ तोळे सोने, चांदी इत्यादी वस्तू घेऊन चोरटे फरार झाल्याची माहिती जखमी गणेश जगताप यांनी दिली.
बुधवार रोजी रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान सदरची घटना घडली. आरोपी हे तोंडाला रुमाल बांधून हातामध्ये दगड व सत्तुर असे शस्त्र घेऊन आले होते. यातील जखमी जगताप हे शेतकरी असून त्यांच्या कांदा या पिकाचे बार्शीतील जय भवानी ट्रेडर्स येथे विक्रीतून आलेल्या 70 हजारांची रक्कम घेऊन ते गावाकडे पोहोचले होते.
सदरच्या प्रकारात आशा गणेश जगताप, मनिषा बिभिषण जगताप, स्वाती सोमनाथ जगताप आदीजण किरकोळ जखमी झाले आहेत. गणेश जगताप यांच्या चेह-यावर, पाठीवर, कमरेला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर बार्शीतील जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेर्ले गावातील व आवटी येथील पारधी असल्याचे समजल्याने जखमीचे नातेवाईक त्यांच्याकडे केले असता, त्यांच्या स्त्रियांची स्वतःची घरे पेटविल्याची माहिती जखमी गणेश जगापत यांनी बोलताना येत नसल्याने कागदावर लिहून माहिती सांगितली आहे.
